ब्रेकिंग ! राज्य सरकारचा मोठा निर्णय, सुरु केली लखपती बिटिया योजना; ‘या’ मुलींना मिळणार १ लाख रुपये

Published on -

Government Scheme : दिल्ली सरकारने आपल्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यास आर्थिक बळ देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ‘लखपती बिटिया योजना’ सुरू करण्याची घोषणा करतानाच विद्यमान ‘लाडली योजना’ ३१ मार्च २०२६ पासून बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नवीन योजना १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत दिल्लीतील मुलींना जन्मापासून पदवीपर्यंत शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर एकूण ५६,००० रुपये दिले जातील.

मुलगी पदवीधर झाल्यानंतर योजनेची मॅच्युरिटी पूर्ण होताच तिला एकरकमी १ लाख रुपये दिले जातील. यामुळे मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल आणि कुटुंबांनाही आर्थिक आधार मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.

लाडली योजना बंद करण्यामागील कारण स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाल्या की, ही योजना योग्यरित्या राबवली गेली नाही. अनेक पात्र मुलींना निधी वेळेवर मिळाला नाही.

एकूण १,८६,००० मुलींना लाभ पोहोचला नव्हता. गेल्या वर्षी सरकारने ३०,००० मुली शोधून त्यांना ९० कोटी रुपये वितरित केले. आता ४१,००० मुलींना १०० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेरी पूंजी, मेरा अधिकार’ या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन ही योजना राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नव्या योजनेचे प्रमुख नियम पुढीलप्रमाणे आहेत:

एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींनाच लाभ मिळेल.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.

मुलीचे पदवीपूर्वी लग्न झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

या योजनेसाठी सरकारने एकूण १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुलींच्या शिक्षणात सातत्य राहावे, बालविवाहाला आळा बसावा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News