अहिल्यानगर : गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळेच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या असतानाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीच्या खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी केली.
नगरच्या सराफ बाजारात रविवारी २४ कॅरेट सोने ९०,८३० रुपये प्रति तोळा (जीएसटीसह) या दराने विकले जात होते, तर चांदीचा दर १,०५,००० रुपये प्रति किलो होता. महागाई असूनही ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिले, विशेषतः २४ कॅरेट सोन्याला जास्त मागणी होती. गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. २०२० मध्ये सोन्याचा दर ३०,००० रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर ६०,००० रुपये प्रति किलो इतका होता.

मात्र, रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्ष यासारख्या घटकांमुळे सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या पाच वर्षांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे तब्बल ६०,००० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ४०,००० रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा झाल्याचे दिसून येते.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी केली. यामध्ये बिलवरी अंगठ्या, गड्डी चेन, बांगड्या, नाणे, झुबे, कलकत्ता डिझाइनचे दागिने यांना विशेष मागणी होती. सोन्याचे वाढलेले दर असूनही ग्राहकांचा कल पारंपरिक तसेच नवनवीन डिझाईन्सच्या दागिन्यांकडे अधिक दिसला.
या जोरदार खरेदीमुळे रविवारी नगरच्या सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. सोन्या-चांदीप्रमाणेच वाहन खरेदीलाही नागरिकांनी मोठे प्राधान्य दिले. गुढीपाडव्याला नवी खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने, नगर शहर आणि परिसरातील चारचाकी आणि दुचाकी शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली.
सकाळपासूनच नागरिक कुटुंबासह घराबाहेर पडले होते. अनेकांनी आकर्षक गाड्या पाहिल्या आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्न साकारले. घरी नवीन दुचाकी किंवा चारचाकी गाडी आणल्यानंतर, घरासमोर पूजा करताना लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सोन्या-चांदीचे वाढते दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता असूनही भारतीय ग्राहकांचा गुढीपाडव्यावरील उत्साह कमी झालेला नाही. नवीन खरेदीच्या आनंदात बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला सराफ बाजार आणि वाहन उद्योगात मोठ्या उलाढाली झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.