Business Success Story:- कुठलाही यशस्वी उद्योजक जर आपण बघितला तर तो एका रात्रीत यशस्वी झालेला नसतो. त्याच्या आजच्या या यशामागे त्याच्या भूतकाळातील प्रचंड प्रमाणातील कष्ट कारणीभूत असतात. सुरुवात अगदी छोट्याशा स्वरूपात करून व्यवसायात सातत्य ठेवून घेतलेले कष्ट व व्यावसायिक प्लॅनिंगने व्यवसाय वाढवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न व्यक्तीला यशाच्या शिखराकडे नेतात व आज प्रत्येक उद्योजक जर बघितला तर त्यांच्या यशामागे कठोर परिश्रम असल्याचे दिसून येते.
अगदी याच पद्धतीने जर आपण गोपाल स्नॅक्स लिमिटेडचे सीएमडी बिपिन हडवानी यांची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच प्रेरणादायी अशी आहे. बिपिन हडवानी यांनी शून्यातून व्यवसायाला सुरुवात केली व आज हाच व्यवसाय कोट्यावधींच्या घरात पोहोचला आहे.
बिपिन हडवानी यांनी अशा पद्धतीने पाऊल ठेवले व्यावसायिक जगतात
साधारणपणे 1990 सालचा प्रसंग असेल. बिपिन यांच्या मनामध्ये आले की काहीतरी व्यवसाय सुरू करावा व यामध्ये त्यांनी स्नॅक्सचा व्यवसाय निवडला व हा व्यवसाय सुरू करण्यासाठी वडिलांकडून साडेचार हजार रुपये उसने घेतले व व्यवसायाला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांचे वडील देखील एका छोट्या दुकानातून स्नॅक्सचा व्यवसाय करायचे.
ते गुजराती नमकीन बनवायचे व परिसरातील गावांमध्ये सायकलवर फिरून त्याची विक्री करायचे.जेव्हा बीपीन लहान होते तेव्हा ते वडिलांच्या कामांमध्ये मदत करायचे. जेव्हा त्यांची शाळा सुटायची तेव्हा ते वडिलांना मदत म्हणून त्यांच्यासोबत जायचे व नमकीन विक्री करण्याला मदत करायचे व यापासूनच त्यांना स्नॅक्स व्यवसायातील अनेक बारीक-सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या.
अशा पद्धतीने काम करत असताना त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला व मित्राला सोबत घेऊन आणि वडिलांकडून साडेचार हजार रुपये उसने घेऊन 1990 मध्ये स्नॅक्सचा व्यवसायाचा श्रीगणेशा केला. मित्राच्या भागीदारीत हा व्यवसाय जवळपास चांगला चालला व चार वर्षापर्यंत त्यांची भागीदारी टिकली.
त्यानंतर त्यांनी भागीदारी व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व भागीदारी तुटल्यानंतर बिपिन यांच्या वाट्याला अडीच लाख रुपये मिळाले. या अडीच लाख मधून त्यांनी स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. याकरिता अगोदर 1994 मध्ये एक घर विकत घेतले व या सगळ्या व्यावसायिक प्रवासामध्ये त्यांच्या पत्नीचे त्यांना पूर्ण सहकार्य केले.
यामध्ये त्यांनी सुरुवातीला गोपाल स्नॅक्सचा पहिला कारखाना घरात सुरू केला व तिथूनच ते नमकीन बनवायला लागले. तसेच स्नॅक्स म्हणजेच नमकीनची बाजारपेठ कशा पद्धतीची आहे व यातील बारकावे कसे आहेत हे व्यवस्थित समजता यावे याकरिता ते सायकल वरून प्रवास करत राजकोटच्या बाजारात जायला लागले व त्या ठिकाणी दुकानदार आणि व्यापाऱ्यांना भेटी द्यायला लागले.
अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या उत्पादनाची विक्री वाढवायला सुरुवात केली. व्यवसायातील मागणी पाहून त्यांनी शहराच्या बाहेर प्लॉट खरेदी केला व त्या ठिकाणी कारखाना उभा करायचे ठरवले. परंतु शहरापासून हा कारखाना दूर असल्याने त्यांनी तो बंद केला. परंतु हार न मानता कर्ज घेतले व शहरामध्ये एक छोटीसे युनिट सुरू केले.
हेच युनिट पुढे यशस्वी ठरले व गोपाल स्नॅक्सला एक नवी उंची मिळाली. आज जर आपण गोपाल स्नॅक्स बघितले तर भारतामध्ये चौथ्या नंबरचा हा सर्वात पारंपारिक स्नॅक्स ब्रँड म्हणून ओळखला जातो. मोठ्या कष्टाने सुरू केलेली गोपाल स्नॅक्सची कंपनी आज 5500 कोटी रुपयांच्या घरात आहे.