Hindustan Zinc Share Price:- शेअर बाजारात आज हिंदुस्तान झिंकचा शेअर सर्वाधिक चर्चेत राहिला. कारणही तसंच होतं. एका मोठ्या ब्लॉक डीलनंतर कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल ५ टक्क्यांची घसरण झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच ही घसरण दिसून आली आणि फ्युचर्स व्यवहारात हिंदुस्तान झिंकचा सर्वाधिक तोटा नोंदवला गेला. या घसरणीमागचं मूळ कारण म्हणजे प्रमोटर वेदांतने आपल्या हिस्स्याचा एक भाग विकल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहाराचा एकूण आकार जवळपास ३८४८ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
हिंदुस्तान झिंकची पुढील योजना काय?
हिंदुस्तान झिंकमध्ये १.८९ टक्के हिस्सा या व्यवहारातून विकला गेला. यातून स्पष्ट होतं की मोठ्या प्रमाणात भागभांडवल बाहेर पडल्यामुळे बाजाराने सावध भूमिका घेतली. याच दरम्यान, कंपनीने राजस्थानमधील आपल्या पुढच्या गुंतवणुकीची माहितीही दिली. कंपनीच्या बोर्डाने एकूण १२ हजार कोटी रुपयांच्या भरीव गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत उदयपूरजवळ देबारी येथे एक नवीन झिंक प्लांट उभारण्याची योजना आहे. सुरूवातीला या प्लांटची धातू उत्पादन क्षमता २५० केटी असेल, पण २०३० पर्यंत ती दोन दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे.

या विस्तार योजनेसाठी कंपनीने निधी उभारणीबाबतही स्पष्टता दिली आहे. हिंदुस्तान झिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मिश्रा यांनी सांगितलं की, हे पैसे कंपनी स्वतःच्या उत्पन्नातून आणि आवश्यक असल्यास कर्ज उचलून उभारणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडे सध्या रोख रकमेत कोणतीही अडचण नाही आणि पुढील ३–४ वर्षांमध्ये ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाईल.
या नवीन प्लांटच्या कंपनीला काय होणार फायदा?
या नवीन प्लांटमुळे कंपनीचा उत्पादन खर्च कमी होईल, कार्यक्षमता वाढेल आणि विशेष म्हणजे वीज खर्चातही बचत होईल, असं मिश्रा यांनी स्पष्ट केलं. सध्या कंपनीचं सुमारे ८० टक्के उत्पादन देशांतर्गत बाजारात विकलं जातं, पण उत्पादन वाढल्यावर निर्यातीतही मोठी वाढ अपेक्षित आहे.
वेदांतने अलीकडेच व्यवसाय पुनर्रचनेची योजना उघड केली आहे. त्यामुळे हिंदुस्तान झिंकबाबतही अशीच चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर मिश्रा यांनी सांगितलं की, कंपनी आपल्या चांदी विभागाचं स्वतंत्र्यीकरण करण्याचा विचार करत आहे, पण अजून काही अंतिम झालेलं नाही. सध्या कंपनीचा पूर्ण फोकस विस्तारावर आणि कार्यक्षमतेवर आहे.