Sublimotion | खवय्यांसाठी स्वादिष्ट पदार्थांची चव घेणे ही आयुष्यातली एक अविस्मरणीय अनुभव असतो. अनेकांना वेगवेगळ्या देशांत, शहरांत जाऊन खास खाद्यपदार्थ चाखण्याची आवड असते. पण जर तुम्हाला एका अशा रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्याची संधी मिळाली, जिथे एका डिशची किंमत तब्बल 1.29 लाख रुपये असेल, तर? हो, ही गोष्ट खरी आहे.
सबलिमोशन : जगातील महागडे हॉटेल
हे रेस्टॉरंट स्पेनमधील इबिझा (Ibiza) बेटावर आहे आणि मिशेलिन ट्रॅव्हल गाईडने याला अधिकृतपणे जगातील सर्वात महागडे रेस्टॉरंट म्हणून घोषित केले आहे.

येथे फक्त 12 लोक एकाच वेळी जेवणाचा अनुभव घेऊ शकतात. विशेष म्हणजे हे रेस्टॉरंट वर्षभर सुरू नसून फक्त उन्हाळ्यात उघडले जाते. त्यामुळे येथे जेवण्याची संधी ही एक विशेष आणि दुर्मिळ गोष्ट मानली जाते.
काय सुविधा मिळतात?
सबलिमोशनच्या आतल्या रचना आणि अनुभव खूपच वेगळा आहे. येथे व्हर्च्युअल रिअॅलिटी, लाईटिंग आणि साउंड इफेक्ट्सचा वापर करून वेगवेगळ्या थीम तयार केल्या जातात. ग्राहक ज्या टेबलावर बसून जेवतात, तो भाग एक मत्स्यालयासारखा भासतो. खास म्हणजे येथे अभियंते, तंत्रज्ञ आणि पटकथा लेखकांची एक पूर्ण टीम ग्राहकांच्या अनुभवासाठी काम करते.
हे रेस्टॉरंट 2014 मध्ये पहिल्यांदा सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानंतरपासून हे जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले आहे. येथील अन्नाचा स्वाद जितका खास आहे, तितकाच अनोखा आहे त्याचा सादरीकरण आणि संपूर्ण जेवणाचा अनुभव.
हे फक्त एक जेवण नसून, संपूर्ण एक “इमर्सिव एक्सपीरियन्स” आहे, जिथे दृश्य, ध्वनी आणि चव यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो. तुमच्याकडे पुरेसा वेळ, बजेट आणि विलक्षण अनुभव घ्यायची तयारी असेल, तर सबलिमोशन हे ठिकाण एकदा तरी भेट द्यावे असेच आहे.