श्रीगोंदा- शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने ‘इन्फिनाइट बिकन’ या प्लॅटफॉर्म वरती एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार रक्कम परत मिळविण्यासाठी आक्रमक झाले असून, गुंतवणूकदारांच्या ससेमिऱ्यापासून सुटका होण्यासाठी पसार झालेल्या कंपनीच्या एजंटची आलिशान चारचाकी गाडी काही दिवसांपूर्वी फोडली असल्याची चर्चा आहे.
श्रीगोंदा तालुक्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात केवळ ७८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात ‘इन्फिनाइट बिकन’ या प्लॅटफॉर्मच्या १२ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी देत जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक झाल्या प्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
नवनाथ अवताडे याने दोन वर्षापूर्वी श्रीगोंदा तालुक्यात संदीप दरेकर याच्यासह इतर काही मंडळींना हाताशी धरून लोकांना इन्फिनाइट बिकन कंपनीच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखविले गेले. लोकांनी या कंपनीत पैसे गुंतवणूक करावेत, यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये कमिशन एजंट लोकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रोत्साहित करत असे. बघता बघता नवनाथ औताडे अन् त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या टीमचा तालुक्यात गवगवा झाला.
कमिशन एजंट लोकांनी प्रत्येक गावात जाऊन लोकांना, नातेवाईक मंडळींनी यामध्ये रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. रक्कम गुंतवणूक करताना एजंट लोकांनी गुंतवणूकदारांच्या रकमेची हमी देत गुंतवणूक करून घेतली. एजंट हे स्थानिक तसेच नात्यातील असल्याने गहाण ठेवून कर्ज काढली, महिलांनी साठवलेले पैसे, दागिने गहाण ठेवून उपलब्ध झालेले रकमेची गुंतवणूक केली होती.
रकमेचा परतावा बंद झाल्याने कर्जाऊ घेतलेल्या रकमेचा तगादा होऊ लागल्याने गुंतवणूकदारानी गुंतवलेली रक्कम माघारी मिळण्यासाठी कंपनी एजंटच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुन्हा दाखल करण्याऐवजी गुंतवणूकदारांनी रकमेची जबाबदारी घेतलेल्या कंपनी एजंटच्या मागे रकमेसाठी ससेमिरा लावला आहे. एजंट लोकांना जबाबदार धरत त्यांना रकमेसाठी धारेवर धरले असल्याने गुंतवणूकदारांच्या ससेमिऱ्यापासून सुटका होण्यासाठी कंपनीचे एजंट गायब झाले असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.