Indigo Share Price :- इंटरग्लोब एव्हिएशनकडे इंडिगो या भारतातील आघाडीच्या हवाई वाहतूक कंपनीची मालकी आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये १.५% वाढ दिसून आली. ही वाढ जरी सकारात्मक असली तरी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था जसे की, गोल्डमन सॅक्स आणि कोटक सिक्युरिटीज यांनी कंपनीच्या शेअर्ससाठी टार्गेट प्राईस कमी केल्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके यामागील कारणे काय? याची थोडक्यात माहिती बघू.
शेअरच्या वाढीमागील कारणे
इंडिगोने सध्या भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. महामारीनंतर हवाई प्रवासाला आलेली मागणी आणि कंपनीचे किफायतशीर व्यवस्थापन हे वाढीमागील महत्त्वाचे घटक ठरले आहेत. प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे उत्पन्न वाढले आहे. शिवाय, नवीन विमानांची खरेदी, विमानांच्या ताफ्यामधील वाढ आणि सेवांमध्ये सुधारणा यामुळे कंपनीची कामगिरी बळकट होत आहे. इतकेच नाहीतर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन मार्ग सुरू करणे व प्रवाशांना परवडेल असे भाडे धोरण हे कंपनीला बाजारातील वाढत्या स्पर्धेमध्ये देखील आघाडीवर ठेवत आहे.
का कमी केली टार्गेट प्राईस ?
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी कंपनीच्या काही आव्हानांवर आधारित टार्गेट प्राईस कमी केली आहे.यामागील काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
1-इंधनाच्या किंमतीत वाढ : हवाई कंपन्यांसाठी इंधन हा सर्वात मोठा खर्च असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमती वाढल्यामुळे इंडिगोला इंधनासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कंपनीच्या नफ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
2- डॉलर-रुपया विनिमय दराचा परिणाम : इंधनाची आयात डॉलरमध्ये होते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे इंधन खर्च वाढला आहे व ज्याचा ताण कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर दिसून येत आहे.
3-स्पर्धात्मक दबाव: भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात एअर इंडिया आणि इतर स्पर्धक कंपन्यांच्या आक्रमक धोरणांमुळे इंडिगोला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. कमी भाड्यांमुळे नफ्याच्या मार्जिनवर ताण येत आहे.
4- जागतिक आर्थिक मंदीचे सावट : जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि मंदीचा संभाव्य परिणाम हवाई प्रवासावर होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्यास भाग पाडते.
गुंतवणूकदारांसाठी काय योग्य ?
1- दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवा: इंडिगो हे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील मजबूत ब्रँड असलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. सध्याच्या अल्पकालीन आव्हानांमुळे घाबरण्याची गरज नाही. कंपनीच्या दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेवर विश्वास ठेवून गुंतवणुकीचा विचार करता येईल.
2-बाजाराचा अभ्यास करा: इंटरग्लोब एव्हिएशनच्या व्यवसायाची पॉलिसी नेमकी काय आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळातील प्रकल्पांचा अभ्यास करणे यामध्ये गरजेचे आहे. कंपनीने विविध मार्गांवर प्रवाशी सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे भविष्यातील महसूल वाढीची शक्यता आहे.
3- जोखीम व्यवस्थापन करा: हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये नेहमीच जोखीम असते. इंधनाच्या किमती, जागतिक घटनांचे परिणाम आणि स्पर्धा यांचा विचार करून गुंतवणुकीत विविधता आणावी.
4- तज्ज्ञांचा सल्ला घ्या: गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील तज्ज्ञांचे मत आणि तांत्रिक विश्लेषणांचा आधार घेणे योग्य ठरेल.