Investment Tips:- कष्टाने कमावलेला पैसा जेव्हा कोणताही व्यक्ती एखाद्या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवतो तेव्हा त्याला बऱ्याच प्रकारचा विचार करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण जो काही पैसा गुंतवत आहोत तो सुरक्षित राहील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि दुसरे म्हणजे केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला समाधानकारक असा परतावा मिळेल का? या दोन्ही गोष्टींची जेव्हा सकारात्मक उत्तरे गुंतवणूकदाराला मिळतात तेव्हाच गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. त्यामुळे या लेखात आपण असेच काही महत्त्वाचे गुंतवणुकीचे पर्याय बघणार आहोत. ज्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात जोखीम असते किंवा जवळजवळ नसतेच व परतावा देखील चांगला मिळतो.
जोखीममुक्त गुंतवणुकीचे पर्याय
1- पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना- ही एक अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेत वर्षाला पाचशे ते दीड लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करता येऊ शकते. ही एक सरकारी योजना आहे व हे या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सध्या या योजनेत जर गुंतवणूक केली तर 7.1% दराने व्याज देण्यात येत आहे. तसेच यातून मिळणारा व्याजाचा लाभ आणि परिपक्वतेनंतर मिळणारी एकूण रक्कम टॅक्स फ्री आहे.

2- जीवन विमा- विमा पॉलिसी घेणे म्हणजे जीवन विमा हा एक गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय तर आहेच. परंतु त्यासोबतच तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची एक योग्य हमी देखील या माध्यमातून मिळते. तुम्ही कुठलीही एलआयसी पॉलिसी घेतली तर तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळते आणि दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबाला विमा संरक्षण देखील मिळते.
3- मुदत ठेव योजना अर्थात एफडी- एफडी हा सगळ्यात लोकप्रिय असा गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामध्ये एका निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक करता येते व त्या कालावधीपर्यंत तुमचे पैसे यामध्ये सुरक्षित राहतात व चांगला परतावा देखील मिळतो व त्यावर तुम्हाला फिक्स असा व्याजदर मिळत असतो. काही बँकांच्या FD योजनांमध्ये कर सवलत देखील मिळते. तसेच कर्जाची व अंशतः पैसे काढण्याची सुविधा देखील काही योजनांमध्ये मिळत असते.
4- रिकरिंग डिपॉझिट योजना- या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करता येते व त्यावर एफडी इतकेच व्याज मिळते. ज्यांना छोट्याशा बचतीतून चांगला फंड उभा करायचा असेल त्यांच्यासाठी रिकरिंग डिपॉझिट योजना अतिशय फायद्याची आहे.
5- सोन्यातील गुंतवणूक- भारतामध्ये पूर्वापारपासून सोने खरेदी करण्याकडे आपल्याला कल दिसून येतो. सोन्यात गुंतवणूक करायची तर सोन्याचे दागिने तसेच गोल्ड एटीएफ किंवा सॉवरेन गोल्ड बॉण्ड या माध्यमातून गुंतवणूक करता येऊ शकते. तुम्हाला जर महागाई आणि जोखीमीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर गुंतवणुकीचा हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला माहित आहे की सोन्याच्या दरामध्ये कालांतराने वाढ होत राहते व त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो व संपत्ती सुरक्षित ठेवण्याचा हा एक विश्वासू मार्ग आहे.