LIC Scheme:- प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवत असतो.या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक ही अनेक अर्थाने खूप महत्त्वाचे असते. त्यातल्या त्यात प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आयुष्यभर आपण काबाडकष्ट करत असतो व आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये सुखाने समृद्ध आर्थिक जीवन जगता यावे व याकरिता अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनिंग करत असतात.
आयुष्याच्या उतारवयामध्ये व्यक्तीला पैशांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये याकरिता आतापासूनच व्यवस्थित आर्थिक नियोजन करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. अगदी याच प्रकारे तुम्हाला देखील तुमच्या निवृत्तीनंतर पैशांची चिंता नको असेल व तुमच्याकडे चांगला पैसा हवा अशी तुमची इच्छा असेल तर या लेखामध्ये एलआयसीच्या महत्त्वाच्या एका योजनेची माहिती दिलेली आहे.ही योजना तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय समृद्ध करू शकते.

एलआयसीच्या जीवन शांती योजनेचे स्वरूप
एलआयसीची जीवन शांती योजना ही एक अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेला एकच प्रीमियम योजना म्हणून ओळखली जाते. म्हणजेच या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. या योजनेत कमीत कमी दीड लाख रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येऊ शकते व तुम्ही तुमच्या आर्थिक बजेटनुसार जास्तीची गुंतवणूक यामध्ये करू शकतात. या योजनेत तुम्ही जितक्या जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक कराल तितक्या जास्त प्रमाणात तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळत असतो.
या योजनेत साधारणपणे 30 ते 79 वर्ष वयोगटातील लोकांना सहभागी होता येते. या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवायला सुरुवात केली तर पाच वर्षांनी तुम्हाला पेन्शन मिळणे सुरु होते. समजा तुम्ही 55 वर्षाच्या आहात आणि तुम्ही एकदाच 11 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पुढील पाच वर्षांनी म्हणजेच तुम्ही जेव्हा साठ वर्षे वयाचे व्हाल तेव्हापासून तुम्हाला दरवर्षी एक लाख रुपये पेन्शन मिळू लागते. तसेच यातून मिळणारी पेन्शन तुम्ही महिन्याला किंवा तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा दरवर्षी ह्या पॅटर्नमध्ये घेऊ शकतात.
तसेच यामध्ये तुम्हाला सिंगल लाईफ प्लान घेता येऊ शकतो. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे या प्लॅनच्या माध्यमातून फक्त एका व्यक्तीला पेन्शन मिळते. जर तुम्ही या योजनेत जॉईंट लाइफ प्लान घेतला तर पती-पत्नी दोघांनाही पेन्शनचा लाभ मिळू शकतो. या जॉईंट लाईफ प्लॅनमध्ये जर एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर उर्वरित पैसे त्याने नामांकित केलेल्या व्यक्तीला जातात व अशाप्रकारे संपूर्ण कुटुंब देखील आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पॉलिसी सुरू झाल्यापासून तीन महिन्यानंतर तुम्हाला या पॉलिसीवर कर्ज देखील घेता येऊ शकते व या माध्यमातून तुम्हाला तुमच्या वार्षिक पेन्शनच्या 50% पेक्षा जास्त कर्ज मिळू शकत नाही. अशाप्रकारे ही योजना अनेक अर्थांनी खूप फायद्याची आहे.