IPO 2025:- येणारा आठवडा तसेच येणाऱ्या काही महिन्यांमध्ये शेअर मार्केटमध्ये अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार आहेत. त्यामुळे जे गुंतवणूकदार आयपीओ मध्ये गुंतवून पैसे कमावण्याच्या संधीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी येणारे दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. या येत असलेल्या आयपीओमध्ये जर आपण बघितले तर टाटा ग्रुपची वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटल आपला आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या आयपीओचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा 2025 मधील सर्वात मोठा आयपीओ असू शकणार आहे.
ब्लूमबर्गचा अहवाल काय?
मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर टाटा ग्रुपची वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटल आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत असून यासंबंधीचे महत्त्वाची माहिती ब्लूमबर्गच्या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे. या अहवालानुसार बघितले तर कंपनीचा हा आयपीओ ऑक्टोबर मध्ये येण्याची दाट शक्यता असून या इशू मधून टाटा कॅपिटल साधारणपणे 17200 कोटी रुपये उभारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये कंपनी 47.58 कोटी शेअर्स विकणार आहे. तसेच यामध्ये 21 कोटी इक्विटी शेअर्सचा नवीन इशू आणि 26.58 कोटी शेअरचा ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. तसेच टाटा कॅपिटलच्या आयपीओमध्ये टाटा सन्स 23 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये विकणार असून त्यासोबत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन 3.58 कोटी शेअर विकणार आहे.

टाटा कॅपिटल मधील टाटा सन्सचा वाटा किती?
टाटा सन्स टाटा कॅपिटलची होल्डिंग कंपनी असून टाटा कॅपिटल मध्ये त्यांचा 93% हिस्सा आहे व उर्वरित हिस्सा या समूहातील इतर कंपन्या आणि ट्रस्टकडे आहे. विशेष म्हणजे टाटा कॅपिटलला रिझर्व बँक ऑफ इंडियाने देखील अप्पर लेयर एनबीएफसीचा दर्जा दिलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कॅपिटलने लिस्टिंग करिता सल्लागार म्हणून दहा गुंतवणूक बँकांची नियुक्ती केली असल्याची माहिती समोर आलेली आहे व यामध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी तसेच जेपी मॉर्गन, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचएसबीसी सेक्युरिटी आणि एसबीआय कॅपिटल आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे.
या आयपीओसाठी फेब्रुवारीमध्ये मिळाली बोर्डाची मंजुरी
विशेष म्हणजे टाटा कॅपिटलला फेब्रुवारीमध्ये आयपीओ साठी बोर्डाची मान्यता मिळाली असून या आयपीओपूर्वी बोर्डाने फेब्रुवारीमध्ये एक हजार पाचशे चार कोटींच्या राइट्स इशूला देखील मान्यता दिलेली होती. 2023 मध्ये टाटा टेक्नॉलॉजीच्या लिस्ट नंतर टाटा ग्रुप कंपनीचा हा पहिला आयपीओ असणार आहे.