No Cost EMI : सणासुदीचा हंगाम सुरू होताच कंपन्या आणि बँकांनी ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. काही डिस्काउंट देत आहेत तर काही कॅशबॅक सारख्या ऑफर्स देत आहेत. तर काही ई-कॉमर्स वेबसाइटवर बहुतेक वस्तूंवर नो कॉस्ट ईएमआय ऑफर केली जात आहे. अशा परिस्थितीत, अनेक ग्राहकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की कंपनी किंवा बँक खरोखरच नो कॉस्ट ईएमआयवर कोणतेही शुल्क आकारत नाही की हा केवळ एक भ्रम आहे.
खरं तर, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर सध्या बर्याच ऑफर आणि सूट दिल्या जात आहेत. यामध्ये बहुतांश ग्राहकांचा भर नो कॉस्ट ईएमआय सारख्या पर्यायांवर असतो. यामध्ये, उत्पादनाची किंमत हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय तर आहेच, पण त्या EMI वर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे.

नो कॉस्ट ईएमआयचे सत्य?
बँकांच्या दृष्टिकोनातून, नो कॉस्ट ईएमआय म्हणजे या प्रकारच्या ईएमआयची परतफेड करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. तसेच त्यांना कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. अशा प्रकारे, ईएमआयमध्ये किंमत भरल्यानंतरही ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडत नाही. मात्र, ही सुविधा विशिष्ट प्रकारची कार्डे किंवा बँकांकडूनच दिली जाते.
ऑफर कशी कार्य करते?
नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत, बँका त्यांच्या ग्राहकांकडून व्याज घेतात परंतु ते सवलतीच्या स्वरूपात परत करतात. अशा प्रकारे, व्याजाची रक्कम ग्राहकाला परत केली जाते. ग्राहकाकडून फक्त प्रक्रिया शुल्क आकारले जाते, जे खूपच कमी असते. बँकेने आकारलेले व्याज नंतर ग्राहकाला ऑफर म्हणून परत केले जाते.
उदारणार्थ, Fujitsu चा Core i7 लॅपटॉप 31 टक्के सवलतीसह ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर 1,04,990 मध्ये उपलब्ध आहे. यावर, Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डद्वारे नो कॉस्ट ईएमआय ऑफर केली जात आहे. ही किंमत 3 महिने आणि 6 महिन्यांत हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा आहे. बँक त्यावर 15.99 टक्के व्याज आकारत असली तरी, व्याज म्हणून वसूल केलेली संपूर्ण किंमत ग्राहकाला सूट म्हणून परत केली जाते.
समजा, 3 महिन्यांच्या हप्त्यावर 2,737 रुपयाचे व्याज आकारले जाते, त्यातील संपूर्ण रक्कम सवलत म्हणून परत केली जाते. त्याचप्रमाणे, 6 महिन्यांच्या हप्त्यावर 4,728 रुपये व्याज आकारले जाते, ते देखील थेट परत केले जाते. अशा प्रकारे, ग्राहकांना लॅपटॉपची एकूण किंमत फक्त 1,04,990 रुपये द्यावी लागते.