Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घबराट पाहायला मिळत आहे. केवायसी साठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
परंतु केव्हायसी करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान केवायसी साठी लाडक्या बहिणींना पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड सुद्धा द्यावे लागत आहे. दरम्यान केवायसी साठीची हीच अट काही लाडक्या बहिणींची डोकेदुखी ठरू लागली आहे.

खरंतर अनेक लाडक्या बहिणींचे वडील हयात नाहीत, काही बहिणीचे पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे. यामुळे अशा पात्र लाभार्थ्यांना केवायसी करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या लाभार्थ्यांनी नेमकी केवायसी कशी करायची हा मोठा प्रश्न देखील उपस्थित झाला होता.
दरम्यान आता याच समस्यावर सरकारने एक उपाय काढला आहे. या अशा लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती हयात नाहीत अथवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांना केवायसी करताना इतर नातेवाईकांचे आधार कार्ड देण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार वडील किंवा पती नसतील तर अशा महिलांनी सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार कार्ड जोडावे.
लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी स्थानिक पातळीवर महिलेचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाचे किंवा मुलगा, चुलत / मावस भावंडे यापैकी कुणाची आधार कार्ड जोडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नक्कीच महिला व बाल विकास विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तरी अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना आत्तापर्यंत एकूण 15 हप्ते मिळाले आहेत. जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमधील लाभ महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तसेच ऑक्टोबर चा लाभ देखील लवकरच पात्र महिलांना मिळणार आहे.
ऑक्टोबरचा हप्ता हा महिन्याच्या शेवटी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असा अंदाज होता. मात्र ऑक्टोबर उलटल्यानंतरही हप्त्याचे पैसे मिळाले नसल्याने आता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील असा अंदाज आहे.













