Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी शिंदे सरकारने एक नवीन योजना सुरू केली होती. ही योजना राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 15 हप्ते मिळाले आहेत आणि आता या योजनेच्या पुढील हफ्त्याची आतुरतेने वाट पाहीली जात आहे.
तुम्हालाही राज्य शासनाचा या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळत असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात नुकताच 15 वा म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.

सामाजिक न्याय विभागाकडून यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. आतापर्यंत जवळपास सर्वच पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता वर्ग झाला आहे आणि यामुळे यावर्षी लाडक्या बहिणींची दिवाळी आनंदात साजरा होणार आहे.
या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाखो महिलांना या हप्त्यामुळे आर्थिक दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता महिला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत. सणासुदीचा काळ सुरू झाल्याने महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबरचा हप्ता मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ऑक्टोबरचा हप्ता महिन्याअखेरीसपर्यंत जमा होण्याची शक्यता असून, संबंधित प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या योजनेशी संबंधित ई-केवायसी प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील महिलांना दिलासा देत सरकारने ई-केवायसीसाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली आहे. इतर जिल्ह्यांतील महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांच्या मते, आतापर्यंत 1 कोटींहून अधिक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, दररोज सुमारे 4 ते 5 लाख महिलांची प्रक्रिया पूर्ण होत आहे. तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाची योजना ठरली आहे.
नियमित हप्ते वेळेवर मिळाल्यास ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या उपजीविकेला बळ मिळणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता असल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.