Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच या योजनेचा पंधरावा हप्ता दिला जाणार आहे.
या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून सप्टेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे. अशातच आता सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसी अनिवार्य केली आहे.

यासाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच ज्या महिला केवायसी करणार नाही त्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचेही बोलले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे दरवर्षी महिलांना केव्हायसी करावी लागणार आहे.
दरवर्षी जून महिन्यात केव्हायसीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान जर तुम्हीही लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला केव्हायसी करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.
कारण आज आपण केवायसी कशी करणार याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर केवायसी प्रक्रिया नेमकी कशी करता येईल याची माहिती दिली आहे.
केवायसीची प्रक्रिया कशी करावी
e-KYC साठी
ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि Captcha कोड टाकायचा आहे. आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. नंतर सेंड ओटीपी या बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो नंबर दिलेल्या रकान्यात टाकून सबमिट करायचे आहे.
यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
- माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.













