Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेला लाडकी बहीण योजना या नावाने संपूर्ण देशभर ओळखले जात आहे. योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून मिळत असून या अंतर्गत आतापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून आता महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरता आहे.

मीडिया रिपोर्ट मध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता जमा होईल असा दावा केला जातोय. दरम्यान सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आज याबाबतचा शासन निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आलाय. शिंदे सरकारने सुरू केलेल्या लाडके बहिणी योजनेचा अनेक अपात्र महिलांकडून लाभ घेत असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या.
अपात्र लाभार्थ्यांकडून योजनेचा लाभ घेतला जात असल्याची बाब शासनाच्या समोर आल्यानंतर शासनाने आता या योजनेसाठी काही कठोर नियम तयार केले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांची ई केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडेच लाडक्या बहिणींची केवायसी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता आणि त्यानंतर आता याबाबतचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे. शासन निर्णय जारी झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींना केवायसी करायची आहे.
केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाईल. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लाडक्या बहिणींना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
आज जारी झालेल्या शासन निर्णयातून लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे परिपत्रक जारी झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत केवायसी करायची अशा सूचना जीआर मध्ये दिलेल्या आहेत.
तसेच दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या आत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश या जीआर मधून देण्यात आले आहे. अर्थात आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे.