Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी एका कल्याणकारी योजनेची सुरुवात केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू झाली. योजनेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे नाव मिळाले. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातोय आणि आत्तापर्यंत एकूण 14 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग झालाय. विशेष म्हणजे सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर मध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल अशी माहिती हाती येत आहे.

अशी सारी परिस्थिती असतानाच आता फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी दोन दिवसांपूर्वी जीआर जारी करण्यात आला आहे आणि जीआर जारी झाल्यापासून दोन महिन्यात केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून केवायसीला सुरुवात झाली आहे.
पण केवायसी करताना महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर केवायसीची प्रक्रिया सुरू झाली असेल तरीदेखील अनेकांकडून केवायसी करताना ERROR दाखवत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, केवायसी करताना महिलांना अडचण येण्याचे प्रमुख कारण काय याची आता आपण माहिती पाहूयात. लाडक्या बहिणींना केवायसी करताना आपल्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड सादर करावे लागणार आहे.
जर महिला विवाहित असेल तर तिच्या पतीचे आधार कार्ड तीला सादर करावे लागेल. अविवाहित किंवा विधवा महिला असेल तर तीला वडिलांचे आधार कार्ड द्यावे लागणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड हे मोबाईल नंबर सोबत लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक नसेल तर काहीही केले तरी केवायसी पूर्ण होणार नाही.
त्यामुळे महिलांनी सर्वप्रथम आपल्या वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक आहे की नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. KYC करण्यासाठी महिलांना राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.
ladakibahin.maharashtra.gov.in या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन महिलांना केवायसी पूर्ण करायची आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर महिला E-KYC बॅनरवर क्लिक करून केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतील.