Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ही योजना गेल्या वर्षी शिंदे सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांना एकूण 15 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा लाभ नुकताच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. सदर योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली असून या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभामुळे सर्वसामान्य महिलांचे जीवनमान उंचावत आहे.

दरम्यान लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या आणखी सक्षम बनवण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना शून्य टक्के व्याजदरात एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शहर व आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत कोणतेही व्याज न घेता महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचा कर्ज पुरवठा केला जातोय.
महत्त्वाची बाब म्हणजे ही योजना गेल्या महिन्यापासून अर्थात सप्टेंबर महिन्यापासून सुरू असून याचा लाभ सुद्धा काही महिलांना देण्यात आला आहे. याबाबत स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियामध्ये माहिती दिली आहे.
ही योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू करण्यात आली असून येत्या काळात राज्यातील उर्वरित भागांमध्ये देखील या योजनेची अंमलबजावणी शक्य असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेकडून बँकेने लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेल्या कर्ज पुरवठा योजनेच्या अंतर्गत 57 पात्र लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचा कर्ज पुरवठा सुद्धा केला आहे.
या संबंधित पात्र लाडक्या बहिणींना मंत्री तत्कारे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले आहे. या संदर्भात मंत्री तटकरे आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांची एक्सवरील (ट्विटर) पोस्ट
आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेच्या एका कार्यक्रमासाठी मंत्री तटकरे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रातून महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
तसेच महिलांना आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी, व्यावसायिक मार्गदर्शन आणि विविध सेवा पुरवणाऱ्या ‘मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टी-सर्व्हिस सेंटर’ आणि महिलांना विशेष मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महिला कक्षा’चे आज शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी बँकेने सुरू केलेल्या व्यावसायिक कर्ज योजनेतून 57 महिलांना कर्ज धनादेशांचे वाटप करताना मला विशेष आनंद झाला.
हा कर्ज धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला, त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ आहे ! महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी आमचे सरकार आणि सहकार क्षेत्रातील संस्था नेहमीच कटिबद्ध राहतील.
या यशस्वी उपक्रमाबद्दल मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार श्री. प्रवीणजी दरेकर साहेब व उपाध्यक्ष श्री. सिद्धार्थजी कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.