Ladki Bahin Yojana : तुम्ही पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आहात का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार यासंदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे. खरे तर ऑक्टोबरचा महिना उलटला असतानाही ऑक्टोबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे.
शिवाय येत्या काही दिवसांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होणार आहे आणि यामुळे ऑक्टोबरचा हप्ता अजून काही दिवस लांबणीवर पडणार की काय? अशी भीती देखील लाडक्या बहिणीकडून व्यक्त होत होती.

मात्र आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत स्वतः मंत्रि आदिती तटकरे यांच्याकडून गुड न्यूज देण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑक्टोबरच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
खरे तर गेल्या काही महिन्यांपासून लाडक्या बहिणींना फारच उशिराने हप्ता मिळत आहे. जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये, ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये आणि आता ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबर मध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
दरम्यान ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना नेमक्या कोणत्या तारखेला मिळणार या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे उद्यापासून अर्थात चार नोव्हेंबर 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच मंत्री तटकरे यांनी लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाल्यात मंत्री तटकरे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !













