Loan Information:- आयुष्यामध्ये अचानक पणे काही कारणास्तव पैशांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते व आपल्याकडे तेव्हा पैसा नसतो. त्यामुळे साहजिकच मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैशांची मदत घेतली जाते. यासोबतच बऱ्याचदा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोनचा पर्याय देखील अवलंबला जातो. परंतु बँकांच्या माध्यमातून जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याला कागदपत्रांची गरज व एका प्रक्रियेमधून जाणे गरजेचे असते.
तसेच याकरिता तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणे देखील खूप गरजेचे असते. पैशांची जर इमर्जन्सी असेल तर अशा वेळेस बँकांच्या माध्यमातून जर पर्सनल लोन वगैरे घेतले तर त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे या सगळ्या अडचणीतून जर तुम्हाला वाचायचे असेल व आर्थिक अडचणीच्या काळात वेळेत पैसा उपलब्ध व्हावा असे वाटत असेल तर आपण या लेखांमध्ये एक कर्ज पर्यायाचा विचार करणार आहोत. या पर्यायांमध्ये तुम्हाला पर्सनल लोन पेक्षा व्याजदर देखील कमी लागतो आणि सिबिल स्कोरची देखील झंझट राहत नाही.

एलआयसी पॉलिसीच्या माध्यमातून कर्जाचा पर्याय
समजा तुमच्याकडे जर एलआयसीची पॉलिसी असेल तर तुमच्याकरिता हा एक खूप चांगला पर्याय असून या माध्यमातून तुम्ही ताबडतोब कर्ज मिळवू शकतात. या पद्धतीने घेतलेल्या कर्जावर व्याजदर तर कमी असतोच परंतु सिबिल स्कोरचा देखील काही परिणाम होत नाही.
जर तुम्ही तुमच्या एलआयसी पॉलिसी वर जर कर्ज घेतले तर हे सुरक्षित कर्ज प्रकारांमध्ये येते. जस या प्रकारांमध्ये तुमची जी काही विमा पॉलिसी असते ती सुरक्षा म्हणून तारण ठेवली जाते. या कर्जासाठी काही अटी असून त्या म्हणजे तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असणे गरजेचे आहे व तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही संबंधित पॉलिसी करिता कमीत कमी तीन वर्षापासून वार्षिक प्रीमियम भरत आहात. असे असेल तरच तुम्ही एलआयसी पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात.
एलआयसी पॉलिसी वर तुम्ही किती कर्ज घेऊ शकतात?
एलआयसी पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही किती कर्ज घेऊ शकतात किंवा तुम्हाला किती कर्ज मिळेल? हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ते एलआयसी पॉलिसीचे सरेंडर मूल्य किती आहे त्यावर अवलंबून असते. समजा एखाद्या विमाधारकाने त्याची पॉलिसी मुदत संपण्यापूर्वी सरेंडर केली तर विमा कंपनी त्याला एक निश्चित मूल्य परत करते त्यालाच आपण समर्पण मूल्य किंवा सरेंडर मूल्य म्हणतो.
साधारणपणे पाहिले तर एलआयसी पॉलिसी वर मिळणारी कर्जाची रक्कम ही पॉलिसी मूल्याच्या 90% पर्यंत असते व पेड अप पॉलिसी असेल तर त्याकरिता कर्जाची रक्कम पॉलिसी मूल्याच्या 85 टक्क्यापर्यंत असते. या कर्जावरील व्याजदर पाहिला तर तो 10 ते 13 टक्के वार्षिक असा असू शकतो.
तुमच्या सोयीनुसार हप्ते भरण्याची मुभा
महत्वाचे म्हणजे जर तुम्ही या प्रकारचे कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा ईएमआय भरण्याची गरज राहत नाही. तुमच्याकडे जसे पैसे जमा होतात त्यानुसार तुम्ही या कर्जाच्या हप्ते भरू शकतात. परंतु यामध्ये व्याज हे वाढत राहते. परंतु तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही तर तुमच्या पॉलिसीची मुदत संपल्यानंतर व्याजासह कर्जाची रक्कम वजा केली जाते व उरलेले पैसे तुम्हाला मिळतात.
एलआयसी पॉलिसी कर्जासाठी कसा अर्ज करावा?
या पद्धतीने कर्ज घेण्याकरिता तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही प्रकारे अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एलआयसी कार्यालयामध्ये जावे लागेल व आवश्यक केवायसी कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर एलआयसी ई सेवांकरिता तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करावे लागेल व तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीची देवाण-घेवाण करण्यासाठी कर्ज मिळण्यास पात्र आहात की नाही हे तपासणे गरजेचे राहील. जर तुम्ही पात्र असाल तर कर्जाच्या अटी, कर्जावरील व्याजदर इत्यादी काळजीपूर्वक वाचावे व त्यानंतरच अर्ज सबमिट करावा. केवायसी कागदपत्र ऑनलाइन अपलोड करावे.