Mahadbt Scheme: शेतकरी बंधूंनो! महाडीबीटीवरील कोणत्या योजनांसाठी कुठले लागतात कागदपत्रे? बघा लिस्ट

Published on -

Mahadbt Scheme:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि शेतीचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणी करिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येते. या पद्धतीने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी अंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. आपल्याला माहित आहे की ही एक ऑनलाईन योजना पोर्टल आहे व या माध्यमातून अनेक योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जातो. परंतु या पोर्टलच्या माध्यमातून योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. चला तर मग या लेखात आपण बघू की नेमका कुठल्या योजनेसाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता भासते.

महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांच्या अर्जासाठी लागणारे कागदपत्रे

1- कृषी यांत्रिकीकरण योजना- या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध यंत्रांचा लाभ दिला जातो. कृषी यांत्रिकीकरण योजना या घटकांतर्गत अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्यांना सातबारा आणि आठ अ चा उतारा, मंजूर झालेल्या यंत्राचे कोटेशन, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी आरसी बुक, मान्यताप्राप्त संस्थेचा वैध असलेला तपासणी अहवाल, शेतकरी जर अनुसूचित जाती/ जमातीतील असतील तर जात प्रमाणपत्र आणि सामायिक क्षेत्र असेल तर इतर खातेदारांचे संमती पत्र याकरिता आवश्यक असते.

2- वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण- वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अर्ज करायचा असेल विहित नमुन्यातील हमीपत्र 3, सातबारा आणि आठ अ चा उतारा, अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी वैध जात प्रमाणपत्र आणि सामायिक क्षेत्र असेल तर खातेदाराचे संमती पत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.

3- कांदा चाळ- कांदा चाळ अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता अर्ज करताना सातबारा आणि आठ चा उतारा, डीपीआर( प्रपत्र 2 हमीपत्र आणि 4 बंधपत्र), अनुसूचित जाती/ जमातीच्या शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र, सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र आणि सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संपत्ती पत्र

4- प्लास्टिक मल्चिंग- प्लास्टिक मल्चिंग साठी अर्ज करायचा असेल तर सातबारा आणि 8 चा उतारा, सातबारा उताऱ्यावर फलोत्पादन पिकांची नोंद नसेल तर फल उत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र, चतु:सीमा नकाशा, अनुसूचित जाती/ जमातीच्या शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र आणि सामायिक क्षेत्र असलेली तर खातेदारांच्या संमतीपत्र यासाठी आवश्यक असते.

5- हरितगृह/शेडनेटगृहासाठी- या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर त्याकरिता सातबारा आणि 8 अ चा उतारा, विहित नमुनातील हमीपत्र( प्रपत्र 1), विहित नमुन्यातील बंधपत्र( प्रपत्र 2), चतु:सीमा नकाशा, अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र आणि सामायिक क्षेत्र असेल तर खातेदारांचे संमती पत्र आवश्यक असते.

6- भाजीपाला रोपवाटिका- या घटकांतर्गत अर्ज करायचा असेल तर याकरिता तलाठ्याची सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा आणि 8 अ चा उतारा, स्थळदर्शक नकाशा, जमिनीचा चतु:सीमा नकाशा, विहित नमुन्यातील हमीपत्र आणि अनुसूचित जाती/ जमातीच्या शेतकऱ्यांसाठी वैध जात प्रमाणपत्र याकरिता आवश्यक असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe