Maharashtra News : देशात सगळीकडे रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे नेटवर्क आहे. महत्वाची बाब म्हणजे हे नेटवर्क सातत्याने वाढवले जात आहे. रेल्वे कडून दरवर्षी शेकडो किलोमीटर लांबीचे नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. राज्यातही अनेक रेल्वे मार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. रेल्वे कडून डहाणू – नाशिक असा नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. या मार्गाला केंद्रातील सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाली असून आता या प्रकल्पाबाबत एक नवे अपडेट हाती आले आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पासाठी पूर्व प्राथमिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. हा मार्ग डहाणूपासून त्र्यंबकेश्वर पर्यंतच्या आदिवासीबहुल भागातून जाणार आहे. यामुळे या मागासलेल्या भागाचा औद्योगिक विकास सुनिश्चित होईल अशी आशा आहे. हा मार्ग 100 किलोमीटरचा राहणार आहे.
नाशिक – डहाणू रेल्वे मार्गाची गरज लक्षात घेता सर्वप्रथम तत्कालीन खासदार चिंतामण वनगा यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी पहिल्यांदा नाशिक डहाणू रेल्वे मार्गाची मागणी केली. पुढे त्यांच्या निधनानंतर खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेत. सावरा यांनी यासाठी सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला. अखेर दिवंगत खासदार वनगा व खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या मागणीला यश आले. केंद्र सरकारकडून अलीकडेच या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी मिळाली. आता केंद्राच्या मंजुरीनंतर रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक पथकाने या मार्गासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

तसेच याच्या आराखड्याचे काम देखील सुरू झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे मार्गाच्या पूर्व प्राथमिक सर्वेक्षणासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. आता सर्वेक्षणानंतर रेल्वे स्थानके, भौतिक सुविधा व विकासकामांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार झाला की याचा प्रस्ताव केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान हा रेल्वे मार्ग विकसित झाल्यानंतर याचा पालघर जिल्हा सहित नाशिक जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला यामुळे चालना मिळेल असा विश्वास खासदार हेमंत सावरा यांनी व्यक्त केला आहे.