Tata Power Dividend:- आजच्या बाजाराच्या सुरुवातीला काही निवडक कंपन्यांचे शेअर्स ‘एक्स-डिव्हिडंड’ म्हणून ट्रेडिंगला आले आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष त्यांच्याकडे वळलं. हे ‘एक्स-डिव्हिडंड’ ट्रेडिंग म्हणजे काय? तर याचा साधा अर्थ असा आहे की जर एखाद्या गुंतवणूकदाराने आज या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले, तर त्याला त्या शेअर्सवरील लाभांशाचा हक्क मिळणार नाही. कारण यासाठी ठरवलेली ‘रेकॉर्ड डेट’ २० जून होती आणि नियमानुसार त्यापूर्वी म्हणजे १९ जूनपर्यंत शेअर्स खरेदी करणे गरजेचे होते.
या यादीत कोणत्या कंपन्यांचा आहे समावेश?
या यादीत टाटा पॉवर, पीएनबी, बजाज ऑटो, व्होल्टास, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, बँक ऑफ इंडिया अशा मोठ्या नावांचा समावेश आहे. आता हे सगळे शेअर्स ‘एक्स-डिव्हिडंड’ झाले असले, तरी त्यांचे लाभांश अजूनही अंतिम नाहीत. हे प्रस्ताव सध्या कंपन्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांच्या मंजुरीची वाट पाहत आहेत.

कोणती कंपनी देणार किती लाभांश?
आता पाहूया कोणते कंपन्या किती लाभांश देणार आहेत. टाटा पॉवरने आपल्या भागधारकांसाठी ₹१ चे शेअर असलेल्या स्टॉकवर ₹२.२५ चा अंतिम लाभांश सुचवला आहे. ही रक्कम मंजूर झाली तर ती ४ जुलैच्या सभेनंतर वितरित होईल. दुसरीकडे, पंजाब नॅशनल बँकेने ₹२ चे शेअर्स असलेल्या भागधारकांसाठी ₹२.९० चा लाभांश प्रस्तावित केला आहे. पीएनबीसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेसाठी ही एक लक्षवेधी बाब मानली जाते.
बजाज ऑटोचा प्रस्ताव तर सर्वाधिक लक्षवेधी आहे. त्यांनी ₹१० च्या शेअरवर तब्बल ₹२१० चा लाभांश जाहीर केला आहे. जर ही रक्कम एजीएममध्ये मंजूर झाली, तर ८ ऑगस्टच्या सुमारास गुंतवणूकदारांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते. व्होल्टासने देखील ₹१ च्या शेअरवर ₹७ चा लाभांश सुचवला असून, तो एजीएमनंतर पाच दिवसांत वितरित केला जाईल.
एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सने ₹१० च्या शेअरवर ₹२.१० चा अंतिम लाभांश सुचवला आहे, तर बँक ऑफ इंडियाने ₹४.०५ चा लाभांश प्रस्तावित केला आहे. या रकमा जरी तुलनेनं लहान वाटत असल्या, तरी एकूण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून त्या महत्त्वाच्या आहेत, कारण त्या कंपनीच्या आर्थिक स्वास्थ्याचा आणि शेअरधारकांप्रतीच्या बांधिलकीच्या एक सूचक असतात.
आजच्या दिवशी एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग करणाऱ्या इतर काही कंपन्यांमध्ये टोरेंट फार्मा, रोझरी बायोटेक, सुप्रीम इंडस्ट्रीज, ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल, मवाना शुगर्स, सॉलिटेअर मशीन टूल्स आणि स्वस्तिका इन्व्हेस्टस्मार्ट अशा कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे लाभांश प्रमाणात थोडे कमी असले तरी गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक परिणामांवर आणि संभाव्य वाढीवर लक्ष ठेवणं गरजेचं ठरतं.