अहिल्यानगर: नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मनोज वासुमल मोतीयानी (रा. सावेडी गाव, अहिल्यानगर) याला अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
बँकेचा तत्कालीन सहायक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. तसेच, प्रवीण सुरेश लहारे याने ३ कोटींचे कर्ज घेऊन ती रक्कम संशयित आरोपी मनोज वासुमल मोतीयानी याच्या खात्यात वर्ग केल्याचे व त्यातून जागा खरेदी झाल्याचा आरोप आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात मोतीयानी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्याने तो न्यायालयासमोर हजर झाला होता. न्यायालयाने त्याला येथील कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच, गुन्ह्यात अटक करण्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेला कळविले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी उशीरा ताब्यात घेतले आहे.