अहिल्यानगर शहरात महानगरपालिका चार आपले सरकार केंद्र सुरू करणार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

Published on -

अहिल्यानगर – महानगरपालिकेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरामध्ये चार आदर्श आपले सरकार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण होऊन चारही केंद्रे नगरकरांच्या सुविधेसाठी कार्यरत होतील, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत विविध विभागांच्या कामांचा, प्रलंबित योजना, प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मागील बैठकीमध्ये चार प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत चार आपले सरकार केंद्र सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचा आढावा घेतांना सदर केंद्रांसाठी निविदा प्रक्रिया करून प्रस्ताव मागवण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. लवकरात लवकर ही केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले.

तसेच, शहरातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती देणे, मोकाट कुत्री व मोकाट जनावरांवर कारवाईबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, जन्म व मृत्यू नोंदणी विभागाच्या कामात सुसूत्रता आणावी, तेथील अनावश्यक रॅक, साहित्य काढावे, कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या. अहिल्यानगर शहरातील पथविक्रते, फेरीवाल्यांकडून रस्ता बाजू शुल्काची आकारणी केली जाते. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून पुढील आठवड्यापासून वसुली सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe