Mutual Fund : गेल्या काही वर्षात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येथील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते. पण यातून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळत असल्याने अनेकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. तसेच ज्या लोकांना शेअर मार्केटचे फारसे ज्ञान नाही असे लोक म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवत आहेत.
म्युच्युअल फंड देखील शेअर मार्केटशी निगडित आहे. पण शेअर मार्केटच्या तुलनेत यातील जोखीम थोडी कमी असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड खात्यांच्या संख्येत आणि गुंतवणुकीच्या रकमेत वाढ झाली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे दोन प्रकार आहेत.

गुंतवणूकदार एकरकमी म्हणजे Lumpsum आणि दरमहा अर्थातच एसआयपीच्या माध्यमातून येथे गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी एसआयपी हा एक प्रभावी आणि शिस्तबद्ध मार्ग समजला जातो.
एसआयपी द्वारे दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवून मोठा फंड तयार करता येतो. दरम्यान आता आपण दरमहा 5000 रुपयांची एसआयपी केल्यास पंधरा वर्षांनी अंदाजे किती रिटर्न मिळतील याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.
लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ठरणार फायद्याची
एसआयपी करणाऱ्यांनी नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करायला हवी. एसआयपी शॉर्ट मध्ये अपेक्षित परतावा देत नाही. एसआयपी करणाऱ्यांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. यामुळे गुंतवणूकदार जेवढा अधिक काळ गुंतवणूक करत राहतील तेवढाच त्यांना अधिक नफा मिळणार आहे.
एसआयपी मधून कधीच निश्चित परतावा मिळत नाही. पण मागील काही वर्षांचा इतिहास पाहिला असता एसआयपी करणाऱ्यांना सरासरी वार्षिक 12% दराने रिटर्न मिळाले आहेत. अशा तऱ्हेने गुंतवणूकदारांनी दरमहा 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ही एसआयपी पंधरा वर्षे सुरू राहिली तर त्यांना 23.79 लाख रुपये मिळणार आहेत.
यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक नऊ लाख रुपयांची राहणार आहे. तसेच 12 टक्के दराने 14.79 लाख रुपये रिटर्न मिळणार आहेत. समजा गुंतवणूकदारांना एसआयपी मधून 15 टक्के दराने रिटर्न मिळालेत तर पाच हजार रुपये एसआयपी करणाऱ्यांना पंधरा वर्षांनी 30.81 लाख रुपये मिळणार आहेत. एस आय पी मधून मिळणारा परतावा हा निश्चित नसतो.
फिक्स डिपॉझिट किंवा इतर बचत योजनांमधील रिटर्न हे निश्चित असतात. एसआयपी मात्र शेअर मार्केट मधील चढ उतारा वर आधारित असते. तसेच एसआयपी मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे गुंतवणुकी आधी सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासणे गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आहे.