आज शेअर बाजारात एक गोड बातमी आली नेस्ले इंडियाने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. ही बातमी आली आणि अनेक गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. शेअर बाजारात थोडीशी हालचाल जाणवली, पण सगळ्यांच्या नजरा या एका घोषणेकडे लागून राहिल्या. कारण ही केवळ बोनसची बातमी नाही, तर जवळपास २८ वर्षांनी नेस्लेने अशी घोषणा केली आहे.
नेस्ले इंडिया ही आपल्या रोजच्या आयुष्यातील एक ओळखीची कंपनी. मग ते मॅगी असो, किंवा डब्यातील कॉफी नेस्लेच्या उत्पादनांनी आपल्याला कधी ना कधी साथ दिलीच आहे. आता हीच कंपनी आपल्या भागधारकांना म्हणते, “तुमच्याकडे आमचा एक शेअर आहे? तर घ्या, अजून एक मोफत!” म्हणजेच, १:१ चा बोनस एक शेअर धरला, तर अजून एक फ्री मिळणार.

ही घोषणा कंपनीने एक्सचेंजला कळवली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, १ रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी तितक्याच मूल्याचा एक बोनस शेअर दिला जाईल. ही प्रक्रिया मात्र लगेच सुरू होणार नाही. २४ जुलै रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, त्यात अंतिम मंजुरी दिली जाईल.
त्यानंतर रेकॉर्ड डेट म्हणजे ज्या दिवशी शेअर तुमच्या नावावर असला पाहिजे ती तारीख जाहीर केली जाईल. अजून ती कळलेली नाही, पण कंपनीने सांगितलं आहे की लवकरच तीही उघड केली जाईल.
आता तुम्ही म्हणाल, “यात काय विशेष?” तर लक्षात घ्या, नेस्ले इंडियाने १९९६ पासून आजवर कधीच बोनस शेअर्स दिले नव्हते. म्हणजे जवळपास तीन दशके कंपनीने ही कृपा केली नव्हती. त्यामुळेच आजची घोषणा ऐतिहासिक आहे. गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. जरी कंपनीच्या शेअरमध्ये फार मोठी उसळी दिसली नाही, तरी दुपारी १२:३० च्या सुमारास तो सुमारे २४०८ रुपयांवर व्यवहार करत होता.
नेस्ले इंडियाचं एकूण बाजार भांडवल आज २.३२ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. कंपनीच्या शेअरने यावर्षी २७७७ रुपयांचा उच्चांक गाठला आहे, तर नीचांक २११५ रुपयांवरही घसरला होता. त्यामुळे जर तुम्ही गेल्या काही काळात या शेअरमध्ये गुंतवणूक केलेली असेल, तर हा बोनस तुमच्यासाठी खराखुरा बोनसच ठरू शकतो.
आता पुढील काळात नेस्लेच्या धोरणांवर आणि बाजाराच्या प्रतिक्रिया कशा असतात, हे पाहणं रंजक ठरेल. पण एक गोष्ट नक्की नेस्लेने आपल्या भागधारकांना एक गोड सरप्राईज दिलं आहे.