Onion Rate:- शेतकऱ्यांना कांदा दरामध्ये दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांच्या माध्यमातून कांद्याची खरेदी केलेली होती व या दोन्ही संस्थांना साधारणपणे तीन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट सरकारने दिलेले होते व त्यापैकी या दोन्ही संस्थांनी दोन लाख 70 हजार मॅट्रिक टन कांद्याची खरेदी केलेली आहे.
या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला हा तर संशोधनाचा विषय आहे. परंतु ग्राहकांना मात्र यामुळे स्वस्त कांदा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा आता खुल्या बाजारात विक्रीसाठी येणार असून तो पाच ते दहा रुपयांनी स्वस्त मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ग्राहकांना मिळेल 24 रुपये किलो दराने कांदा?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा या आठवड्यामध्ये बाजारात विक्रीसाठी दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा कांदा नाशिक शहरात सात आणि जिल्ह्यात 17 मोबाईल व्हॅनद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून 4 सप्टेंबर पासून राजधानी दिल्लीमध्ये कांदा विक्री सुरू केली आहे व त्या ठिकाणी 24 रुपये किलो दराने कांदा विक्री केली जात आहे.
नाशिककरांना देखील याच दराने कांदा मिळेल अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. सध्या जर आपण बघितले तर स्थानिक बाजारामध्ये 30 ते 35 रुपये प्रति किलो कांद्याचे किरकोळ दर आहेत. परंतु नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा पाच ते दहा रुपयांनी स्वस्त मिळेल. तसेच नाशिक शहरात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा कांदा विक्रीसाठी केला जाणार आहे.
या दोन्ही संस्थांनी साधारणपणे दोन लाख 70 हजार मॅट्रिक टन कांदा खरेदी केलेला आहे व हाच कांदा आता कमी दरात ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. सध्या नाशिक बाजारपेठेतील चांगल्या क्वालिटीच्या कांद्याचे दर जर बघितले तर ते गेल्या पाच ते सहा दिवसांपासून साधारणपणे दहा रुपयांनी वाढले आहेत. परंतु हा सरकारी कांदा जर बाजारात आला तर मात्र ग्राहकांना कांदा दरात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
याचा नक्कीच ग्राहकांना फायदा होणार आहे परंतु शेतकऱ्यांना मात्र याचा कुठलाही फायदा झाल्याचे दिसून येत नाही. तसेच यावर्षी ग्राहकांची फसवणूक होऊ नये व व्यवहार पारदर्शकपणे व्हावा याकरिता नाफेड आणि एनसीसीएफने ट्रॅक अँड ट्रेस सॉफ्टवेअरसह एक नवीन बिलिंग एप्लीकेशन लॉन्च केले आहे व या माध्यमातून किरकोळ विक्री आणि मोबाईल व्हॅन विक्री प्रक्रिया स्वयंचलित केली जाणार आहे. यामध्ये ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे विक्री बिल मिळण्यास मदत होणार आहे.