Oswal Pumps IPO:- आजच्या बाजारात ‘ओसवाल पंप्स’ या कंपनीच्या आयपीओभोवती प्रचंड चर्चा रंगली आहे. आयपीओ सुरू होण्याआधीच गुंतवणूकदारांच्या गप्पांमध्ये त्याचा उल्लेख होऊ लागला आणि ग्रे मार्केटमध्येही याचे प्रीमियम वधारत चालले आहे. १३ जूनपासून हा आयपीओ खुला होणार आहे आणि त्यासाठीची तयारी जोमात सुरू आहे.
या आयपीओची लॉटसाईज काय?
कंपनीने शेअरच्या किमतीसाठी ५८४ ते ६१४ रुपयांचा पट्टा निश्चित केला आहे. म्हणजे ज्यांना यात सहभागी व्हायचं आहे, त्यांनी किमान २४ शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल, आणि एका लॉटसाठी सुमारे १४,०१६ रुपये मोजावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार कमाल १४ लॉट्ससाठी म्हणजेच २८८ शेअर्सपर्यंत अर्ज करू शकतात. कंपनीचा आयपीओ १७ जून रोजी बंद होईल आणि शेअर्स २० जून रोजी NSE आणि BSE वर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

ओसवाल पंप्सने आपल्या आयपीओच्या माध्यमातून जवळपास ८९० कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यामध्ये १.४५ कोटी शेअर्सचा नवीन इश्यू आहे आणि त्यात प्रमोटर विवेक गुप्ता यांच्या ८१ लाख शेअर्सची विक्रीदेखील समाविष्ट आहे. विवेक गुप्ता सध्या कंपनीत २५% पेक्षा जास्त हिस्सा राखून आहेत. या आयपीओतून मिळणारा निधी कंपनी विविध ठिकाणी वापरणार आहे.नवीन प्रकल्पांसाठी, कर्ज फेडण्यासाठी, आणि उपकंपनी ओसवाल सोलरमध्ये गुंतवणुकीसाठी.
या कंपनीचे मुख्य उत्पादन काय ?
कंपनीचं मुख्य उत्पादन म्हणजे शेती आणि सौरऊर्जेशी संबंधित उपकरणं. ‘ओसवाल’ या नावाने बाजारात हे पंप, मोटर्स आणि सोलर मॉड्यूल विकले जातात. हरियाणातील कर्नाल येथे कंपनीचा कारखाना आहे. हे प्रोडक्ट्स केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित नाहीत तर शहरांतील कमर्शियल स्पेस, हॉटेल्स, मॉल्स यांनाही ते पुरवले जातात.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
कंपनीचा आर्थिक प्रवासही तितकाच उत्साहवर्धक आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ७५८ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं, जे मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. नफ्यातही जबरदस्त वाढ झाली असून ३४ कोटींवरून थेट ९७ कोटींवर नफा पोहोचला आहे.
आज ग्रे मार्केटमध्ये या आयपीओचा प्रीमियम जवळपास ४७ रुपये आहे, म्हणजे शेअरची लिस्टिंग किंमत ६६० रुपये असेल, असा अंदाज वर्तवला जात असून जो IPO किमतीच्या वरचाच आहे. त्यामुळे याकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.