Inherited Shares:- आज शेअर बाजारात वाऱ्याच्या वेगाने नाही, पण संथ आणि स्थिर हालचाली झाल्या. गुंतवणूकदारांचा उत्साहही फारसा चढता नव्हता, पण बाजाराने आपली जागा सांभाळत स्थैर्य राखलं. अशा वेळी एका वेगळ्याच प्रकारची आर्थिक गोष्ट चर्चेत आली. ज्यात गुंतवणूक म्हणजे केवळ आजच्या ट्रेंडपुरती गोष्ट नाही, तर घरात कपाटात पडलेला एखादा कागदही भविष्य घडवू शकतो, हे पुन्हा सिद्ध झालं.
काय आहे नेमके प्रकरण?
एका तरुणाला त्यांच्या आजोबांच्या कपाटात काही जुनी कागदपत्रं सापडली. पाहता पाहता लक्षात आलं की ती काही साधी कागदपत्रं नव्हती. तर काही कंपन्यांचे जुने शेअर सर्टिफिकेट्स होती. त्या काळी शेअर्स हे थेट कागदाच्या स्वरूपात दिले जात असत. डिजिटल डिमॅट अकाऊंटसारखी सुविधा नव्हती, त्यामुळे गुंतवणूक करताना कागदी सर्टिफिकेट्स मिळत आणि हीच जुनी गुंतवणूक आज त्यांच्यासाठी कोट्यवधींचा परतावा घेऊन आली.

जुन्या सर्टिफिकेट्सचा फायदा घेण्यासाठी काय करावं?
पण या जुन्या सर्टिफिकेट्सचा फायदा घेण्यासाठी काय करावं लागतं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्या आजोबांकडे असे शेअर्स असतील आणि ते अजूनही जिवंत असतील, तर प्रक्रिया तुलनेत खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त तुमच्या नावाने डिमॅट खात उघडावे लागते जो NSDL किंवा CDSL यांच्यामार्फत सहज उघडता येतो. त्यानंतर एक SH-4 नावाचा फॉर्म भरायचा असतो. यावर आजोबांची सही असते, आणि त्याबरोबर मूळ शेअर सर्टिफिकेट जोडून, कंपनीच्या रजिस्ट्रारकडे म्हणजेच RTA कडे पाठवावं लागतं. हे काम साधारणपणे १५ ते ३० दिवसांत पूर्ण होतं.
पण जर आजोबांचं निधन झालं असेल, तर गोष्ट थोडी गुंतागुंतीची होते. त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र, उत्तराधिकारी किंवा इच्छापत्र, कायदेशीर वारस प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची आवश्यकता असते. यासोबतच डीमॅट खाता असलेल्या संस्थेकडून ‘ट्रान्समिशन रिक्वेस्ट फॉर्म’ मिळवावा लागतो. ही सर्व कागदपत्रं जमा करून ती कंपनीच्या RTA कडे दिली जातात. सर्व काही योग्य असेल तर शेअर्स तुमच्या नावावर ट्रान्सफर होतात आणि थेट तुमच्या डिमॅट खात्यात बसतात.