PDF file with Virus : देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी अनेकजण याचे शिकार होत असून तुमचे बँक खाते रिकामे होण्यासारख्या घटना घडत आहेत.
दरम्यान, तुम्ही एखाद्या संशयास्पद वेबसाइटला भेट देता किंवा एखादी गोष्ट डाउनलोड करता तेव्हाच तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये व्हायरस येईल असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण तुम्ही फाइल उघडताच तुमच्या सिस्टीममध्ये प्रॉब्लम येऊ शकतो.
हॅकर्सनी आता पीडीएफ फाइलला लोकांची बँक खाती रिकामी करण्याचे हत्यार बनवले आहे. सायबर सिक्युरिटी फर्म पालो अल्टो नेटवर्क्सला असे आढळून आले आहे की हॅकर्स ई-मेलद्वारे पीडीएफ फाइल्स पाठवून मालवेअर स्थापित करत आहेत. तसेच “Updated Salary” आणि “invoice_AUG_4601582.pdf” नावाच्या PDF फाईल्स सर्वाधिक वापरल्या जात आहेत.
म्हणूनच, जर तुम्हाला या नावांसह ई-मेलद्वारे कोणतीही PDF तुम्हाला आली असेल तर ती चुकूनही उघडू नका. तुम्ही असे केले तर तुमचे बँक खाते रिकामे झालेच म्ह्णून समजा.
पीडीएफ फाईल्सच्या माध्यमातूनही सिस्टीमवर हल्ला केला जाऊ शकतो हे बहुतांश लोकांना माहीत नाही. याचा फायदा हॅकर्स घेत आहेत. पीडीएफ फाइल अटॅचमेंटसोबत URL लिंक किंवा बटणेही पाठवली जात आहेत. यावर क्लिक केल्यावर, वापरकर्ते फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या वेबसाइटवर पोहोचतात.
या संकेतस्थळांना भेट देणे अधिक धोकादायक आहे
रिपोर्ट्स असे सांगतात की हॅकर्सकडून जे लोक अश्लील वेबसाइट्स आणि आर्थिक सेवा प्रदान करणाऱ्या साइट्सना भेट देतात, ज्यांचे डोमेन नुकतेच नोंदणीकृत झाले आहेत (Newly Registered Domains -NRDs), ते हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत.
याचे कारण असे आहे की नवीन नोंदणीकृत वेबसाइट्सची सायबर सुरक्षा पायाभूत सुविधा प्रस्थापित वेबसाइट्सपेक्षा कमकुवत आहे. या कारणास्तव, फिशिंग, सोशल इंजीनियरिंग किंवा मालवेअर पसरवण्यासाठी या वेबसाइट अधिक प्रभावी आहेत.
हॅकर्सना सध्या एआयमध्ये फारसा रस नाही
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे हॅकर्सना त्यात रस निर्माण झालेला नाही. पालो अल्टो नेटवर्क्सच्या अहवालानुसार हॅकर्सकडून एआयचा वापर कमी प्रमाणात होत आहे. तथापि, ChatGPT लाँच केल्याने आणि त्याचा वाढता वापर, सायबर सुरक्षा तज्ञांना असे वाटले की हॅकर्स त्याचा गैरवापर करतील, परंतु आतापर्यंत असे घडलेले नाही.