Pension Calculation:- कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर उरलेले आयुष्य हे आरामात आणि पैशांच्या बाबतीत समृद्ध रीतीने जगता यावे हे खूप महत्त्वाचे असते व त्याकरिता कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन ही खूप महत्त्वाची ठरते. प्रत्येक कर्मचारी जेव्हा नोकरीच्या कालावधीमध्ये असतो तेव्हा प्रत्येक महिन्याला त्याच्या पीएफमध्ये पैसे जमा होत असतात.
खाजगी क्षेत्रात किंवा सरकारी विभागामध्ये काम करणारे प्रत्येक कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यामध्ये रक्कम जमा करत असतात आयुष्यभर दर महिन्याला यामधूनच पेन्शनचा लाभ मिळत राहतो.
त्यामुळे प्रत्येक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच येत असेल की निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल? हे जाणून घेणे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे काही नियम आहेत? तसेच कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शनची गणना कशी केली जाते? हे देखील माहीत असणे तितकेच फायद्याचे आहे.
पीएफ खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होतात पैसे?
जेव्हा एखादा व्यक्ती खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असतो तेव्हा त्याला मिळत असलेल्या पगाराच्या बारा टक्के रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा केली जाते व तितकीच रक्कम कंपनी देखील पीएफ खात्यात जमा करत असते.
परंतु कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या योगदानापैकी 8.33% योगदान पेन्शन फंडामध्ये आणि उरलेले 3.67% योगदान पीएफमध्ये जमा केले जाते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे काय आहेत पेन्शनसंबंधी नियम?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार बघितले तर तुम्ही दहा वर्षांसाठी पीएफ खात्यात पैसे जमा केले असतील तर तुम्ही निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शनसाठी पात्र होतात. तुम्ही वयाच्या 50 व्या वर्षी पेन्शनचा दावा करू शकतात. परंतु यामध्ये दरवर्षी पेन्शनची रक्कम चार टक्क्यांनी कमी केली जाते.
त्याऐवजी तुम्ही जर 58 व्या वर्षी पेन्शनचा दावा केला तर तुम्हाला पूर्ण पेन्शन मिळते. जर तुम्ही साठ वर्षापर्यंत पेन्शनचा दावा पुढे ढकलत असाल तर त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ होते व वयाच्या सातव्या वर्षी 8% पर्यंत जास्त पेन्शन तुम्हाला मिळते.
पेन्शन मोजण्याचे सूत्र
पेन्शन मोजण्याचे सूत्र खूप महत्त्वाचे असून ते खालीलप्रमाणे आहे….
मासिक पेन्शन(EPS)= सरासरी वेतन× सेवा कालावधी/ 70
यामध्ये सरासरी वेतन म्हणजे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता व सेवा कालावधी म्हणजे तुम्ही किती वर्षे काम केले? याचा समावेश होतो. तसेच या सूत्रातील 70 ही संख्या पेन्शन कॅल्क्युलेट सूत्रातील विभाजक आहे. ज्याचा उपयोग सरासरी पात्र वेतन आणि सेवेच्या आधारे पेन्शन रक्कम मोजण्यासाठी केला जातो.
या सूत्रानुसार वयाच्या साठाव्या वर्षी तुम्हाला किती पेन्शन मिळू शकते?
समजा तुम्ही वयाच्या 23 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली आणि 58 व्या वर्षी निवृत्त झाला तर तुम्ही एकूण 35 वर्षे काम केले व अशा स्थितीमध्ये….
मूळ वेतन 15000( कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन नियमानुसार पेन्शन पात्र वेतनाची कमाल मर्यादा)
सेवा कालावधी 35 वर्ष असेल तर सूत्रानुसार
पेन्शन रुपये 15000×35/70=7500 रुपये प्रतिमहिना यामध्ये पेन्शन मिळू शकते.
यामध्ये तुम्ही जितके जास्त काम कराल तितकी तुमची पेन्शन जास्त असते. तुम्ही काम करत आहात व साठ वर्षे पेन्शनचा दावा केला नाही तर यामध्ये तुम्हाला जास्त पेन्शन मिळते व फायदा होतो.