लोणच्यासाठीच्या कैऱ्या महागल्या ! ७०० रुपये शेकडा भाव, फोडून घ्यायला पन्नास रुपये शेकडा…

Pickle mango

जेवणाची चव वाढवणारा व ताटात हमखास दिसणारा एक पदार्थ म्हणजे कैरीचे लोणचे. हे लोणचे जेवण रुचकर बनवते. ग्रामीण भागात या दिवसात लोणचे बनवण्याची लगबग सुरु होते. परंतु आता लोणच्याच्या कैऱ्या भाव खाताना दिसतायेत.

यंदा कैऱ्यांचे मार्केट जवळपास गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने वाढले आहे. कमी कालावधीत येणाऱ्या कलमी आंब्याकडे सर्वांचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैऱ्यांची आवक जेमतेम आहे. त्यामुळे त्यांचे भाव दामदुप्पट झाल्याने लोणच्यासाठी गावरान कैऱ्या आंबट झाल्याचे चित्र आठवडे बाजारात पाहावयास मिळत आहे.

पूर्वीच्या काळी सर्वांच्या पसंतीला उतरलेले गावरान आंब्यांची झाडे वृक्षतोडीमुळे दृष्टीआड झाले. त्यातही थोडेफार असलेल्या झाडांचा लगडलेला मोहोर ढगाळ वातावरण व उन्हाच्या प्रखरतेमुळे झडून झाडांस जेमतेम कैऱ्या लगडल्या आहेत.

पंधरा वीस दिवसांपासून अधूनमधून दररोज वादळी वारा सुटत असल्याने परिपक्वतेपूर्वीच फळगळती होत असल्याने आंबा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. एवढेच नव्हे तर लोणचे मसाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. ग्रामीण व शहरी भागात पावसाळा व हिवाळा ऋतूत दररोजच्या भोजनासोबत आंब्याच्या लोणच्याचा सर्रास वापर केला जातो

कैऱ्या फोडण्यासाठी पन्नास रुपये शेकडा
कैऱ्या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने गृहिणींचा घरगुती हिशेब कोलमडला आहे. लोणचे टाकण्यापूर्वी कैऱ्या फोडणे अनिवार्य असल्याने पन्नास रुपये शेकड्याप्रमाणे कैरीच्या फोडी करून घ्याव्या लागत आहेत.

त्यामुळे कैऱ्या फोडणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. लोणच्यासाठी मीठ, मोहरी, हळद, तेल, लसुण, मिरे, लवंग, मेथी, तीळ, हिंग आदी वस्तू लागतात मात्र त्यांचेही दर वाढल्याने एकूणच लोणचे महाग झाल्याचे चित्र आहे.

७०० ते ८०० रुपये शेकडा
दरवर्षी ३०० रुपये शेकडा मिळणाऱ्या लोणच्यासाठीच्या कैऱ्या यंदा ७०० ते ८०० रुपये शेकडा तर प्रति ४० रुपये प्रमाणे विकल्या जात आहेत. परिणामी, यंदा लोणच्याची चवच महागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कैरी दुप्पटीने म्हणजे जवळपास ५ ते ६ रुपये प्रती नग झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe