Property Law:- जमिनीचे बक्षीसपत्र हे एक महत्वाचे कायदेशीर दस्तऐवज आहे, जे शेतजमीन, घर, फ्लॅट, दुकान किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता आपल्या जवळच्या नातेवाईकाला विनामूल्य किंवा प्रेमापोटी हस्तांतरित करताना तयार केले जाते. बक्षीसपत्राच्या माध्यमातून मालक स्वतःच्या मालमत्तेचे मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देतो.
अनेक वेळा आई-वडील आपल्या मुलांना, आजी-आजोबा नातवंडांना किंवा पती-पत्नी एकमेकांना प्रेमपूर्वक मालमत्ता देऊ इच्छितात. अशा वेळी भविष्यात नातेवाईकांमध्ये मालकीसंबंधी वाद उद्भवू नये, म्हणून बक्षीसपत्र तयार करून त्याची नोंदणी करणे अत्यावश्यक असते. बक्षीसपत्र हे भावनिक आधारावर दिले गेले तरी त्याला कायदेशीर वैधता देण्यासाठी ठराविक प्रक्रिया आणि नियम पाळावे लागतात.

बक्षीसपत्र तयार करण्याची प्रक्रिया
बक्षीसपत्र तयार करताना सर्वप्रथम संबंधित मालमत्तेचे मूल्यांकन केले जाते. त्या मूल्याच्या आधारावर मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आकारले जाते. महाराष्ट्र राज्यात रक्ताच्या नात्यांमध्ये बक्षीसपत्र करताना सामान्यतः मालमत्तेच्या किंमतीच्या 3% इतके मुद्रांक शुल्क लागते.
मात्र, विशेषतः पती-पत्नी, मुलगा-मुलगी, नातवंडे, आई-वडील यांच्यासारख्या रक्ताच्या नात्यांमध्ये काही प्रमाणात मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाते. हे शुल्क प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार थोडंफार वेगळं असू शकतं. यानंतर संबंधित बक्षीसपत्राचे दस्तऐवज स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) नोंदवले जाते.
बक्षीसपत्र नोंदणी करताना घ्यायची काळजी
बक्षीसपत्र नोंदणी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. सर्वप्रथम, मालमत्तेच्या मूळ मालकाने आणि ज्या व्यक्तीस मालकी हस्तांतरित केली जाणार आहे, त्या दोघांनीही नोंदणी प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेसाठी ओळखीच्या दोन साक्षीदारांचीही गरज भासते.
हे साक्षीदार सद्वर्तनाचे असणे गरजेचे असून त्यांचे आधार कार्ड, ओळखपत्र, पत्ता आदी माहिती द्यावी लागते. रजिस्ट्री करताना मालकाने त्याच्या इच्छेनुसार काही अटी आणि शर्ती घालून देणे देखील शक्य असते. उदाहरणार्थ, आईवडील त्यांच्या मुलांना मालमत्ता देताना, “ही मालमत्ता त्यांच्याच वापरासाठी राहील आणि ती विक्री करता येणार नाही” अशी अट लिहून ठेवू शकतात. यामुळे पुढील काळात त्या अटींचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करता येते.
बक्षीसपत्र हे केवळ एका भावनिक नात्याचं प्रतीक नसून, कायद्याने संरक्षित असा दस्तावेज आहे. त्यामुळे ते योग्य पद्धतीने, संपूर्ण माहिती घेऊन, अधिकृत दस्तावज म्हणून तयार केल्यास भविष्यातील वाद, गैरसमज, किंवा फसवणुकीपासून बचाव होतो.
विशेषतः गावाकडील ठिकाणी शेतजमिनीच्या वाटपाच्या संदर्भात अनेकदा नोंदणी न करता मालकी हस्तांतर केले जाते, जे भविष्यात भांडणाचे कारण बनते. अशावेळी बक्षीसपत्रासारखा कायदेशीर दस्तावेज आवश्यक ठरतो.
अशाप्रकारे ज्या वेळी आपली मालमत्ता आपण आपल्या जवळच्या नात्यातील व्यक्तीस दिली जाते आणि त्यातून कोणतीही आर्थिक देवाणघेवाण होत नाही, त्या वेळी बक्षीसपत्राच्या माध्यमातून मालकीचे कायदेशीर हस्तांतरण करणे आवश्यक ठरते.
त्यामुळे संपत्तीवरचा हक्क स्पष्ट होतो, वाद मिटतात आणि कायद्यात स्पष्टता राहते. जर तुम्हीही अशी मालमत्ता कोणाला देणार असाल, तर योग्य सल्ला घेऊन, साक्षीदारांसह आणि सर्व नियमांचे पालन करून बक्षीसपत्र तयार करणे हे महत्त्वाचे ठरते.