अमेरिकेने टेरिफ वाढविल्यानंतर सोन्याच्या बाजारात अभूतपुर्व तेजी दिसून आली. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किंमती थेट एक लाखांच्यावर पोहोचल्या होत्या. आताही भारत-पाकिस्तानातील तणाव पाहता सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल ओसरलेला दिसत आहे. अशा परिस्थितीतही आरबीआयने मात्र सोने खरेदीचा उच्चांक केला. गेल्या सात वर्षांत आरबीआयने जे केलं नाही ते गेल्या सहा महिन्यांत केलंय. आरबीआयने गेल्या सहा महिन्यांत तब्बल 25 टन सोनं खरेदी केलंय.
सोने खरेदीचे कारण काय?
जगभरातील अनेक देशांत युद्धजन्य स्थिती आहे. याशिवाय भारत व पाकिस्तानमध्येही युद्धजन्य परिस्थिती आहे. अमेरिकेची कमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती गेल्यानंतर जगभरातील व्यापारावर परिणाम झाला. म्हणजेच जागतीक आर्थिक स्थिरता डळमळीत झाली. परंतु भारताने हिच स्थिती लक्षात घेता आर्थिक स्थिरता व सुरक्षा डोळ्यासमोर ठेऊन सोने खरेदीवर भर दिला. आरबीआयने गेल्या सहा महिन्यांत 25 टन सोने खरेदी केले.

किती आहे RBI कडे सोने?
मार्च 2025 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे 879.59 टन सोने होते. जे सप्टेंबर 2024 मध्ये 854.73 टन होते. म्हणजेच फक्त सहा महिन्यांत 25 टन सोने खरेदी करण्यात आले आहे. भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती 30% ने वाढल्या असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही सात वर्षांतील सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे.
परदेशातून भारतात आणले सोने
आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत रिझर्व्ह बँकेने परदेशी बँकांमधून भारतात मोठ्या प्रमाणात सोने आणले. स्थानिक तिजोरीत सोन्याची एकूण प्रमाण 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 510.46 टन होते. 31 मार्च, 2024 रोजी हे प्रमाण 408 टनाहून अधिक होते. या ताज्या अहवालानुसार एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा सहा महिन्याअगोदर 9.32 टक्के वाढला. मार्च 2025 च्या अखेरपर्यंत 11.70 टक्क्यांपर्यंत तो वाढला. सोन्याच्या साठ्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.