RBI चा मोठा निर्णय : ATM मधून आता 100 व 200 च्या नोटा मिळणार; परंतु ‘या’ निर्णयाने खिशाला झळही बसणार

Published on -

युपीआय पेमेंटची सुविधा आल्यापासून अगदी छोट्या-छोट्या व्यवहारातही मोबाईल बँकींगचा वापर केला जाऊ लागला. तरीही भारतात रोखीचा वापर आजही मोठ्या प्रमाणात होतो आहे. बाजारात 100 व 200 च्या नोटांचा वापर सर्वाधिक होतो. परंतु एटीएमवरुन पैसे काढताना मात्र या नोटा मिळत नाही. आरबीआयने सामान्यांची हिच अडचण ओळखून आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

काय घेतलाय निर्णय?

एटीएमवर यापूर्वी फक्त 500 च्या नोटाच मिळत होत्या. मात्र आता एटीएममध्ये 100 व 200 रुपयांच्या नोटाही मिळणार आहेत. सामान्य ग्राहकांची गरज ओळखून आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता सामान्यांना सुट्या पैशाची अडचण वाढणार नाही. आरबीआयच्या मते, छोट्या नोटांची उपलब्धता वाढवल्याने सामान्य माणसाला दैनंदिन व्यवहार करणे सोपे होईल. यामुळे बाजारातील रोखीच्या तुटवड्याचा प्रश्नही सुटेल. हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागात उपयुक्त ठरेल. तिथे डिजिटल पेमेंटची सवय अजून पूर्णपणे रुजलेली नाही.

कधीपासून होणार अंमलबाजवणी?

एटीएममधील 100 व 200 रुपयांच्या नोटांची अंमलबजावणीचा पहिला टप्पा ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचा आहे. तोपर्यंत देशातील 75% एटीएममध्ये किमान एक कॅसेट 100 किंवा 200 रुपयांच्या नोटांनी भरलेली असावी.

एटीएम शुल्क वाढणार ?

मात्र त्याबरोबरच अजून एक निर्णय घेण्यात आलाय ज्यामुळे ग्राहकांना जास्त भुर्दंड पडणार आहे. एटीएममधून छोट्या नोटा मिळणार, ही आनंदाची बातमी आहे. पण दुसरीकडे शुल्कवाढीचे वास्तव आहे. 1 मे 2025 पासून एटीएम वापराचा खर्च वाढणार आहे. विशेषतः तुमच्या बँकेच्या नेटवर्कबाहेरील एटीएम वापरल्यास हा भुर्दंड जास्त असेल. राष्ट्रीय भुगतान महामंडळाने (एनपीसीआय) शुल्कवाढीचा प्रस्ताव दिला होता तो आरबीआयने मान्य केला आहे.

नवे शुल्क कसे असेल?

1. पैसे काढण्याचे शुल्क:
सध्या दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास 17 रुपये शुल्क आकारले जाते. 1 मेपासून हे शुल्क 19 रुपये होईल.

2. बॅलन्स तपासण्याचे शुल्क:
सध्या 6 रुपये असलेले हे शुल्क 7 रुपये होईल.

3. व्यवहाराची मर्यादा किती?
मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. सध्या ही रक्कम २१ रुपये आहे. मेट्रो शहरांत ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या एटीएममधून पाच आणि इतर बँकेच्या एटीएममधून तीन मोफत व्यवहार मिळतात. यापुढील प्रत्येक व्यवहाराला शुल्क लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe