Financial Year Closing : RBIचा महत्वाचा निर्णय! शनिवारी आणि रविवारीही सुरु राहतील देशातील बँका….

Financial Year Closing

Financial Year Closing : भारतात दर रविवारी बँकेला सुट्टी असते. याशिवाय महिन्यातील दोन शनिवारी बँका बंद असतात. मात्र, हा आठवडा वेगळा ठरणार आहे. कारण या आठवड्यात शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बँका सुरू राहणार आहेत. बँका सुरु ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेने यासंबंधित स्वतंत्र अधिसूचना जारी केली आहे. रिझर्व्ह बँकेने 20 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, सर्व एजन्सी बँकांच्या सर्व शाखा शनिवार, 30 मार्च आणि रविवार, 31 मार्च रोजी सुरू राहतील. म्हणजेच ज्या बँकांवर आरबीआयची ही अधिसूचना लागू आहे, त्या बँकांच्या शाखा या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही सुरू राहणार आहेत.

या वीकेंडला बँका सुरू राहण्याचे कारण म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवट. चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यानंतर 1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष 2024-25 सुरू होईल. चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस रविवारी आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की चालू आर्थिक वर्षात होणारे सर्व सरकारी व्यवहार या आर्थिक वर्षाच्या खात्यांमध्ये नोंदवले जावेत. या कारणास्तव, शनिवार आणि रविवार असूनही, एजन्सी बँकांना त्यांच्या सर्व शाखा चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन दिवशी उघडण्यास सांगण्यात आले आहे.

एजन्सी बँक म्हणजे अशा बँका ज्या सरकारी व्यवहारांची पुर्तता करतात. एजन्सी बँकांमध्ये 12 सरकारी बँकांसह 33 बँकांचा समावेश आहे. त्यामध्ये SBI, PNB, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक यासह सर्व प्रमुख बँकांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, सेंट्रल बँकेची जी कार्यालये सरकारी कामाचे व्यवहार करतात, ती कार्यालयेही शनिवार आणि रविवारी सुरू राहतील.

नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, बँका दोन्ही दिवशी सामान्य कामकाज करतील आणि सामान्य वेळेनुसार सुरू राहतील. सामान्य इलेक्ट्रॉनिक व्यवहार दोन्ही दिवस चालतील. याचा अर्थ नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) दोन्ही ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध असतील. तसेच दोन्ही दिवशी चेक क्लिअरिंग सेवा देखील उपलब्ध असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe