Investment Tips:- गुंतवणूक करण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत व प्रत्येक गुंतवणूकदार पैसे गुंतवताना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि त्यातून आपल्याला किती फायदा म्हणजेच किती परतावा मिळेल याचा विचार करून गुंतवणूक करत असतात.
यामध्ये जर आपण गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर भारतीय मोठ्या प्रमाणावर पहिल्यापासूनच सोने खरेदीकडे वळलेले दिसून येतात. कारण भारतामध्ये सोन्यातील गुंतवणूक ही फायदेशीर समजली जाते. आपली आर्थिक क्षमता पाहून आपण सोन्याची गुंतवणूक किंवा सोन्याची खरेदी करू शकतो.

यामध्ये आपण एक हजार रुपयापासून देखील गुंतवणूक करू शकतो. तसेच याव्यतिरिक्त घर खरेदी म्हणजेच रिअल इस्टेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवली जाते. परंतु सोन्याच्या तुलनेत जर घर खरेदीचा विचार केला तर तुम्हाला एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते.
या सगळ्या दृष्टिकोनातून जर तुमच्याकडे पैसा असेल व तुम्हाला गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल की घर खरेदीमध्ये गुंतवणूक करणे एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या लेखामध्ये तुम्हाला घर खरेदीतून जास्त फायदा मिळेल की सोने खरेदीतून याबद्दलची माहिती बघणार आहोत.
चांगला परताव्यासाठी सोने की घर खरेदी करावी
1- जास्त आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून- समजा तुम्ही घर किंवा प्लॉट खरेदी केला तर यामध्ये तुम्हाला अतिरिक्त कर सवलत मिळते व याशिवाय नियमित उत्पन्नाचे पर्याय मिळतात.
यामध्ये तुम्ही निवासी असो वा व्यावसायिक बांधकामामध्ये गुंतवणूकदारांसाठी मासिक भाड्याने रोख स्वरूपात उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता असते. परंतु ही गोष्ट सोन्याच्या गुंतवणुकीतून करता येत नाही.
2- मिळणाऱ्या परताव्याचा दर- जर आपण घर भाड्याचे दर पाहिले तर त्या दृष्टिकोनातून भाड्याच्या स्वरूपात घरापासून 15% वार्षिक परतावा मिळू शकतो. तसेच अशा स्थावर मालमत्त्यांचे मूल्य देखील हळूहळू वाढत असते.
परंतु या तुलने जर आपण सोन्याचा विचार केला तर सोन्याचा वापर प्रामुख्याने महागाईपासून बचाव करण्यासाठी प्रामुख्याने करतात. म्हणजेच महागाईच्या सोबत सोन्याचा परतावा असतो. जर अर्थव्यवस्था कोसळली तर सोन्याला भाव येतो. परंतु तो देखील तात्पुरता स्वरूपाचा असतो.
3- अस्थिरता व धोक्याच्या दृष्टिकोनातून– घरातील गुंतवणुकीचा विचार केला तर हा स्थिर गुंतवणुकीचा पर्याय आहे व यामध्ये जोखीम देखील कमी असते. परंतु सोने गुंतवणुकीत अस्थिरता आणि चोरी होण्याची देखील मोठी जोखीम असते.
4- दीर्घकालीन फायदा- घर किंवा बांधकाम जितके जुने असेल तितके त्याची व्हॅल्युएशन म्हणजेच किंमत अधिक असते. कारण आपण जमिनीची निर्मिती करू शकत नाही आणि वाढत्या लोकसंख्येची मागणी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे घरांच्या किमती या सातत्याने वाढणारे आहेत.
परंतु सोन्याचे बाबतीत अशा पद्धतीचा फायदा मिळण्याची शक्यता नाही. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज अचानक भासली तर तुम्ही गोल्ड लोन यावर घेऊ शकतात.
5- कर सवलतीच्या दृष्टिकोनातून- तुम्ही जर रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली तर यामध्ये अनेक कर सवलती मिळू शकतात. रिअल इस्टेट मधील गुंतवणूक ही सुरक्षित असतेच परंतु या माध्यमातून नियमित उत्पन्न देखील मिळते
व काही कालावधीनंतर विक्री केली तर चांगला परतावा देखील मिळू शकतो. त्यामुळे संपत्ती आणि मालमत्ता तयार करण्यासाठी घरामधील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे व तो फायद्याचा आहे.