९ जानेवारी २०२५ मुंबई : जगभरातील केंद्रीय बँकांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या गंगाजळीमध्ये ५३ टन सोन्याची भर घातली आहे.यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या आठ टन सोने खरेदीचा समावेश होता,अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने एका अहवालात दिली आहे.
जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणात स्थिर आणि सुरक्षित मालमत्तेची गरज लक्षात घेऊन बहुतेक उदयोन्मुख बाजारपेठांच्या मध्यवर्ती बँकांनी गेल्या वर्षात सोने खरेदीचे धोरण कायम ठेवले.गेल्या नुकत्याच संपलेल्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याच्या मागणीत आघाडीची भूमिका बजावली.
मध्यवर्ती बँकांनी एकत्रितपणे त्यांच्या सोन्याच्या धारणेमध्ये नोव्हेंबरमध्ये ५३ टन वाढ केली. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यात सोने खरेदीची प्रक्रिया सुरू ठेवली आणि या महिन्यात तिच्या रिझर्व्हमध्ये आणखी ८ टन सोन्याची भर पडली.
यासह गेल्या वर्षात रिझर्व्ह बँकेने ७३ टन सोने खरेदी केले असून सोन्याचा एकूण साठा ८७६ टन झाल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.गेल्या वर्षात सोने खरेदीच्या बाबतीत रिझर्व्ह बँक पोलंडच्या नॅशनल बँक ऑफ पोलंड मध्यवर्ती बँकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.या बँकेने नोव्हेंबरमध्ये एकूण २१ टन सोन्याची खरेदी केली असून यावर्षीची एकूण खरेदी ९० टन झाली आहे.