Share Market News : शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी होती. पण मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी शेअर मार्केटमध्ये सलग सहा दिवसांच्या तेजीला विराम मिळाला. कारण मार्केटमध्ये काल मोठी नफावसुली झाली. नफा वसुलीसाठी अनेक गुंतवणूकदारांनी शेअर्सची जोरदार विक्री केली आणि याचा गुंतवणूकदारांना मोठा फटका.
जागतिक बाजारातील मिश्र संकेत, डॉलरची मजबुती आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे दलाल स्ट्रीटवर मोठा दबाव दिसून आला. दिवसअखेर सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल निशाणावर बंद झालेत अन गुंतवणूकदारांमध्ये फारच चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले.

सेन्सेक्स २७७.९३ अंकांनी म्हणजे ०.३३% घसरत ८४,६७३.०२ वर स्थिरावला. तर निफ्टी १०३.४० अंकांनी (०.४०%) घसरून २५,९१०.०५ च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी ५० मधील तब्बल ४० शेअर्स तोट्यात बंद झाले, ज्यामुळे मार्केटची व्यापक कमजोरी स्पष्ट झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात मोठी घट झाली. मागील ट्रेडिंग सेशनच्या ४७७.१४ लाख कोटींच्या तुलनेत बाजारभांडवल ४७४.६७ लाख कोटींवर आले. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल २.४७ लाख कोटींचा बट्टा बसला.
ब्रॉडर मार्केटमध्येही तीव्र घसरण दिसली. निफ्टी मिडकॅप-१०० इंडेक्स ३५९ अंकांनी कोसळला, तर निफ्टी बँक निर्देशांक ६३ अंकांनी घसरत ५८,८९९ वर बंद झाला. रियल्टी, मेटल, आयटी, फायनान्शियल्स, कन्झ्युमर आणि फार्मा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक विक्रीचा दबाव जाणवला.
दरम्यान आज आपण या घसरणीच्या काळात कोणते टॉप पाच शेअर्स तेजीत राहिलेत आणि कोणत्या पाच शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली या संदर्भातील माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे शेअर्स होते तेजीत
सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त ७ शेअर्स तेजीत राहिलेत. भारती एअरटेलमध्ये काल १.७८% वाढ झाली. त्यापाठोपाठ अॅक्सिस बँकच्या शेअर्समध्ये १.२७% वाढ झाली. एशियन पेंट्सने काल गुंतवणूकदारांना ०.९२% रिटर्न दिलेत.
टायटनच्या शेअर्सने ०.४३% रिटर्न दिलेत. तसेच पॉवर ग्रिडने ०.२४% रिटर्न दिलेत. दुसरीकडे, आयटी क्षेत्र सर्वाधिक कमजोर राहिले. टेक महिंद्राचा शेअर २.२३% घसरला, तर इन्फोसिसमध्ये १.४६% घसरण झाली. बजाज फायनान्समध्ये १.३२ टक्के घसरण झाली.
बजाज फिनसर्वमध्ये १.२८ % घसरण झाली आणि ईटरनल यांचेही शेअर्स १.१६% घसरणीसह बंद झाले. पुढील काही दिवस अशीच चढउताराची स्थिती राहण्याची शक्यता आहे यामुळे गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.













