शेअर बाजारात चढउतारानंतर तेजी, सेन्सेक्स-निफ्टीत खरेदीचा जोर; गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल

Published on -

Share Market News : देशांतर्गत शेअर बाजारात आज मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रात बाजाराची सुरुवात वाढीसह झाली असली, तरी काही वेळ विक्रीचा दबाव जाणवला.

या विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक थोडक्यात घसरले. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा खरेदीकडे मोर्चा वळवल्याने बाजाराने जोरदार पुनरागमन केले आणि प्रमुख निर्देशांक पुन्हा वर चढताना दिसले.

पहिल्या एका तासाच्या व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स सुमारे 0.31 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता, तर एनएसई निफ्टीत 0.32 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

सकाळी 10.15 वाजता सेन्सेक्स 259.55 अंकांच्या वाढीसह 84,325.30 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टी 83.60 अंकांच्या वाढीसह 25,950.90 अंकांवर व्यवहार करत होता.

आज सेन्सेक्सने 144.25 अंकांच्या वाढीसह 84,210 अंकांवर सुरुवात केली होती. मात्र सुरुवातीच्या काही मिनिटांत नफावसुली आणि विक्रीमुळे तो 84,063.47 अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स पुन्हा सावरला. निफ्टीनेही 55.35 अंकांच्या वाढीसह 25,922.65 अंकांवर सुरुवात केली होती. सुरुवातीच्या घसरणीनंतर तो 25,870.45 अंकांपर्यंत खाली आला, मात्र नंतर खरेदी वाढल्याने निर्देशांक पुन्हा उंचावला.

शेअरनिहाय विचार करता, एटरनल, टाटा स्टील, जिओ फायनान्शियल, टेक महिंद्रा आणि मारुती सुझुकी या आघाडीच्या शेअर्समध्ये 1.44 ते 2.75 टक्क्यांपर्यंत चांगली वाढ दिसून आली. याउलट बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि एशियन पेंट्स या शेअर्समध्ये 0.66 ते 1.41 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली.

एकूण बाजारातील हालचाली पाहता 2,711 शेअर्समध्ये व्यवहार सुरू होते. त्यापैकी 1,962 शेअर्स वाढीसह हिरव्या निशाणात, तर 749 शेअर्स घसरणीसह लाल निशाणात व्यवहार करत होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्स वाढीसह, तर 7 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. निफ्टीतील 50 पैकी 36 शेअर्स वाढीसह आणि 14 शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसले.

दरम्यान, सोमवारी झालेल्या मागील व्यवहारात सेन्सेक्स 485.35 अंकांनी म्हणजेच 0.58 टक्क्यांनी वाढून 84,065.75 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 173.60 अंकांनी म्हणजेच 0.68 टक्क्यांनी वाढून 25,867.30 अंकांवर बंद झाला होता. आजच्या व्यवहारातही हीच सकारात्मकता कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News