अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण ! वॉल स्ट्रीट जर्नलच्या ‘त्या’ जुन्या रिपोर्टमुळे बाजारात खळबळ; गुंतवणूकदारांमध्ये भीती

Published on -

Share Market Update : अमेरिकन सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन (SEC) संदर्भातील प्रकरण ताजे असतानाच उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्राइजेजबाबत आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने जून २०२५ मध्ये केलेल्या गंभीर आरोपांनंतर, अदानी समूह आता अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोल (OFAC) सोबत चर्चेत असल्याची अधिकृत माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

या बातमीचा थेट परिणाम सोमवारी शेअर बाजारात दिसून आला असून अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांचे समभाग घसरले.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे आरोप असून ते आरोप मागे घेण्यासाठी तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

यासोबतच, अदानी समूहाच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टमार्फत इराणमधून लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) आयात करण्यात आली का आणि त्यामुळे अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाले का, याचीही चौकशी सुरू असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र, अदानी समूहाने त्या वेळी हे सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले होते.

दरम्यान, अदानी एंटरप्राइजेजने शेअर बाजाराला दिलेल्या अधिकृत माहितीत सांगितले की, ४ फेब्रुवारी रोजी OFAC कडून माहिती मागवण्याची विनंती प्राप्त झाली आहे.

या प्रकरणात कंपनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी पूर्ण सहकार्य करत असून विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना आवश्यक ती माहिती पुरवली जात आहे. “आमच्याकडून कोणतेही नियमभंग किंवा गैरव्यवहार झालेले नाहीत,” असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी अदानी एंटरप्राइजेजचा शेअर १,८००.१० रुपयांवर बंद झाला होता, तो मंगळवारी व्यवहारादरम्यान १,७१० रुपयांपर्यंत घसरला.

बातमी लिहिताना हा शेअर सुमारे २ टक्क्यांच्या घसरणीसह १,६६५ रुपयांवर व्यवहार करत होता. याशिवाय अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी ग्रीन यांसारख्या इतर समूहातील शेअर्समध्येही ३ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवण्यात आली.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन तपास यंत्रणांशी संबंधित कोणतीही बातमी बाजारासाठी संवेदनशील असते. पुढील काही दिवसांत या प्रकरणावरून अधिक स्पष्टता येईपर्यंत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News