Share Market Update : भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रातच या शेअरवर विक्रीचा जोर दिसून आला. निफ्टी 50 आणि निफ्टी ऑटो या दोन्ही निर्देशांकांवर महिंद्राचा नकारात्मक परिणाम झाला.
बाजार उघडताच महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. पावणे बारा वाजता कंपनीचा शेअर तब्बल 118.60 रुपयांनी घसरून 3424.80 रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

या घसरणीमागे भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात होऊ घातलेल्या मुक्त व्यापार कराराची चर्चा मुख्य कारण ठरत आहे. या करारामुळे युरोपियन युनियनमधील वाहन उत्पादकांना भारतीय बाजारात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
विशेषतः ऑटोमोबाईल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात युरोपियन कंपन्यांची स्पर्धा वाढणार आहे. इलेक्ट्रिक वाहने, इंटरनल कंबशन इंजिन्स आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र कोटा निश्चित केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
सध्या युरोपमधून भारतात आयात होणाऱ्या कारवर 66 ते 110 टक्के आयात शुल्क आकारले जाते. मात्र मुक्त व्यापार करार लागू झाल्यानंतर हे शुल्क 30 ते 35 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने हे शुल्क 10 टक्क्यांपर्यंत आणले जाऊ शकते. यामुळे युरोपियन लक्झरी आणि प्रीमियम कार भारतीय बाजारात स्वस्त होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार, या कराराचा सर्वाधिक परिणाम प्रीमियम, एक्झिक्युटिव्ह आणि आलिशान कार सेगमेंटवर होऊ शकतो. विशेषतः 23 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वाहनांमध्ये स्पर्धा वाढेल.
त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यावर दबाव येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. XUV700 आणि स्कॉर्पिओसारख्या लोकप्रिय मॉडेल्समुळे महिंद्रा या सेगमेंटमध्ये मजबूत स्थानावर असली तरी वाढती स्पर्धा कंपनीसाठी आव्हान ठरू शकते.
दरम्यान, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार 2027 पासून लागू होण्याची शक्यता आहे, कारण काही कायदेशीर प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. मागील वर्षी 7 एप्रिल 2025 रोजी महिंद्राचा शेअर 2360.45 रुपयांवर होता.
त्यानंतर शेअरमध्ये सुमारे 62.68 टक्क्यांची वाढ झाली होती. 5 जानेवारीला शेअरने 3840 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र सध्याच्या घसरणीमुळे त्या उच्चांकापासून जवळपास 400 रुपयांची घसरण झाली आहे.













