Silver Price : सोने – चांदी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढली आहे. कारण म्हणजे शेअर मार्केट मधील अस्थिरता. दरम्यान मागील वर्ष चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे.
दरम्यान 2026 देखील चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तसेच खास राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे चांदीची किंमत अजूनही तेजीत आहे.

चांदीची किंमत आता थेट तीन लाख रुपयांच्या घरात जाणार असल्याचा एक महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. तज्ञांच्या या भाकिताची जोरदार चर्चा सुद्धा सुरू आहे.
पुढील काही तास चांदीच्या किमतीसाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. देशातील वायदा बाजारात चांदीचे दर 2 लाख 75 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे आता चांदी 3,00,000 रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठणार का ? हे पहावे लागणार आहे.
अभ्यासकांच नवीन भाकीत
आज दरांमध्ये आणखी 10 ते 15 हजार रुपयांची वाढ झाली तर बाजार बंद होईपर्यंत चांदी 3 लाख रुपयांवर पोहोचू शकते, असा अंदाज बुलियन बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात आतापर्यंत चांदीच्या दरात सुमारे 17 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेतील डिसेंबर महिन्याची महागाई 2.7 टक्के इतकी नोंदवण्यात आली असून ही आकडेवारी अपेक्षेप्रमाणे आहे.
त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर कपातीचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट फायदा मौल्यवान धातूंना होत असून सोने आणि चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत आहेत.
याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फेडरल रिझर्व्ह यांच्यातील वाढता संघर्ष, टॅरिफसंदर्भातील संभाव्य न्यायालयीन निर्णय, तसेच रशिया-युक्रेन युद्ध, इराण आणि इतर देशांबाबतची आक्रमक भूमिका यामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असून चांदीला मोठा आधार मिळत आहे.













