Silver price Prediction:- सध्या सोने आणि चांदीच्या दारांनी विक्रमी पातळी गाठली असून यामध्ये जर चांदीच्या दरांचा विचार केला तर एका वर्षात आतापर्यंत चांदीच्या किमतींमध्ये अंदाजे 49 हजार रुपयांची वाढ झालेली आहे. टक्केवारीत बघितले तर ही वाढ 57% इतकी आहे. याबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये चांदीची मागणी वाढत आहे त्यामुळे चांदीची दरवाढ वेगाने होत असून यावर्षी चांदीच्या किमती 1 लाख 50 हजार पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही देखील विचार करत असाल की चांदीमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवावा तर या लेखात दिलेली माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
सिल्वर ईटीएफ हा चांदीतील गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय
सिल्वर ईटीएफ म्हणजेच सिल्वर एक्सचेंज ट्रेडेड फंड होय. हा फंड चांदीच्या किमतींवर आधारित असून यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवता येतात आणि हे पैसे चांदीच्या किमतीनुसार चढ-उतार होतात. या माध्यमातून तुम्हाला खरी चांदी खरेदी करण्याची गरज भासत नाही व चांदी ठेवण्यासाठी तिजोरी किंवा एखाद्या लॉकरची देखील गरज यामध्ये राहत नाही. यात फंड हाऊस यासंबंधीची सर्व प्रक्रिया हाताळते आणि तुम्ही ते स्टॉक एक्सचेंज वर डिमॅट खात्याच्या माध्यमातून चांदीची खरेदी आणि विक्री करू शकतात.

सिल्वर ईटीएफ मधील फंड हाऊस खऱ्या चांदीची खरेदी करतो आणि ते चांदी 99.99% शुद्ध असते. तुम्ही खरेदी करत असलेल्या ईटीएफची किंमत चांदीच्या बाजारभावानुसार बदलते. समजा चांदीच्या किमतीत वाढ झाली तर तुमचा ईटीएफ देखील वाढतो आणि नंतर तो विक्री करणे सोपे जाते. शेअर बाजाराच्या ट्रेडिंग सेशनच्या वेळेत तो विकून टाकणे गरजेचे असते.
सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय?
या माध्यमातून तुम्हाला युनिट्समध्ये चांदी खरेदी करता येते. म्हणजे अगदी कमी प्रमाणात देखील तुम्ही चांदीची खरेदी करू शकतात. सध्या सिल्वर ईटीएफच्या एका युनिटची किंमत 150 रुपये आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही अवघ्या 150 रुपयांमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात. दुसरा फायदा म्हणजे इलेक्ट्रॉनिक चांदी डिमॅट खात्यात ठेवली जाते व त्यासाठी फक्त वार्षिक डिमॅट शुल्क तुम्हाला भरावे लागते. शिवाय यात चोरीचा धोका राहत नाही आणि इतर सुरक्षा खर्च देखील वाचतो.
विशेष म्हणजे सिल्वर ईटीएफ कोणत्याही अडचणी शिवाय तुम्हाला पटकन खरेदी करता येतो आणि पटकन विकता देखील येतो. म्हणजेच तुम्हाला जर पैशांची गरज भासली तर तुम्ही तो विकू शकतात. परंतु यातील जर एक धोका बघितला तर चांदीच्या किमती जर कमी झाल्या तर ईटीएफचे मूल्य देखील कमी होते. तुम्हाला जर यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर साधारणपणे तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावी. कारण चांदीच्या किमती कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असतात.