Split Stock News: 10 रुपयांचा शेअर झाला फक्त 1 रुपयाचा! गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा?

Published on -

Split Stock News:- आज शेअर बाजारात एक महत्त्वाची घडामोड घडली व ती म्हणजे व्हेसुवियस इंडिया लिमिटेड या कंपनीचे शेअर्स आजपासून “एक्स-स्प्लिट” म्हणून ट्रेडिंग करत आहेत. याचा अर्थ असा की, आजपासून कंपनीचे शेअर्स १० तुकड्यांमध्ये विभागले जात आहेत. ज्यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची तारीख ठरते.कारण आजच रेकॉर्ड डेट आहे.

नेमका काय आहे हा निर्णय?

व्हेसुवियस इंडिया ही उद्योगजगतातील एक नावाजलेली कंपनी असून, आजपर्यंत गुंतवणूकदारांना वेळोवेळी फायदा मिळवून देणाऱ्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. या कंपनीने शेअर स्प्लिटचा निर्णय घेतलेला असून, पूर्वी १० रुपयांचं दर्शनी मूल्य असलेला एक शेअर आता १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या १० शेअर्समध्ये विभागला जाईल. थोडक्यात सांगायचं झालं, तर एका मोठ्या शेअरचे आता दहा छोटे भाग होतील. या स्प्लिटनंतर गुंतवणूकदारांच्या खात्यात शेअर्सची संख्या वाढेल, पण गुंतवणुकीची एकूण किंमत मात्र तशीच राहील.

कंपनीने यापूर्वी लाभांश देण्याबाबतीत चांगली शिस्त राखली आहे. एप्रिल २०२५ मध्येच तिने प्रति शेअर ₹१४.५० चा लाभांश दिला होता. त्या आधी २०२४ च्या सुरुवातीला ₹१२.७५ आणि २०२३ मध्ये ₹८.२५ चा लाभांश कंपनीने वाटला होता. २०२२ मध्येही तिने ₹८ प्रति शेअरचा लाभांश दिला होता. म्हणजेच, नियमित लाभांश देण्याची परंपरा असलेली ही कंपनी आहे.

आज या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी काय?

आजच्या ट्रेडिंगमध्ये मात्र व्हेसुवियस इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये किंचित घसरण झाली. सत्राच्या अखेरीस हा शेअर ₹५८९९.६० वर बंद झाला, म्हणजे जवळपास २.२५ टक्क्यांनी घसरलेला होता. पण जर मागील काही आठवडे पाहिले, तर या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यातच त्याने सुमारे २२ टक्के उडी घेतली आणि मागील तीन महिन्यांमध्ये तर तब्बल ४० टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. वर्षभर धरून पाहिलं, तर गुंतवणूकदारांना सुमारे १०.८ टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.

अशाप्रकारे जर आपण बघितले तर व्हेसुवियस इंडियाचा शेअर स्प्लिट हा गुंतवणूकदारांसाठी एक उत्सुकतेचा विषय ठरत आहे. अशा शेअर स्प्लिटमुळे नवीन गुंतवणूकदारांसाठी प्रवेशद्वार उघडते, कारण विभागल्यानंतर शेअरची किंमत तुलनेत कमी होते, आणि त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनाही गुंतवणूक करण्याची संधी मिळते. आता पाहायचं एवढंच की स्प्लिटनंतरही या शेअरची कामगिरी अशीच मजबूत राहते का आणि गुंतवणूकदारांना भविष्यात याचा किती फायदा होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe