Stock To Buy : येत्या १ फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा वळणबिंदू ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत आत्मनिर्भर भारताच्या धोरणामुळे संरक्षण क्षेत्रात झालेले बदल, स्वदेशी उत्पादनांची वाढती क्षमता आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकार यंदा संरक्षण भांडवली खर्चात मोठी वाढ करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण भांडवली खर्चात किमान १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ अपेक्षित असून काही विश्लेषक तर ही वाढ २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते असेही मानतात.
सध्या भारताचा संरक्षण खर्च जीडीपीच्या २ टक्क्यांपेक्षा कमी आहे, मात्र आगामी काळात तो २.५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे लष्कराचे आधुनिकीकरण, हवाई व नौदल क्षमता बळकट करणे आणि स्वदेशी उद्योगांना चालना देणे शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीतच सरकारने वार्षिक भांडवली खर्चाच्या सुमारे ६२ टक्के खर्चाची अंमलबजावणी केली आहे. हा वेग मागील वर्षांच्या तुलनेत अधिक असून, संरक्षण मंत्रालयाच्या तयारीचे स्पष्ट संकेत देतो.
याचबरोबर भारताची संरक्षण निर्यातही झपाट्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी ठरवलेल्या ३.३ अब्ज डॉलर्सच्या उद्दिष्टापैकी जवळपास ८७ टक्के निर्यात आधीच पूर्ण झाली आहे. २०३० पर्यंत ही निर्यात ५०० अब्ज रुपयांपर्यंत नेण्याचे स्वप्न आता वास्तवाच्या दिशेने जाताना दिसते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची विश्वासार्हता वाढत आहे. युरोपियन युनियनसोबत संभाव्य व्यापार करार, तसेच युएई, जपान आणि इटलीसारख्या देशांशी झालेले धोरणात्मक सहकार्य यामुळे ब्रह्मोस, आकाश क्षेपणास्त्रे आणि पिनाका रॉकेट प्रणालीसाठी मागणी वाढत आहे. याचा थेट फायदा भारतीय संरक्षण कंपन्यांना होत आहे.
गुंतवणूकदारांच्या दृष्टीनेही हे क्षेत्र आकर्षक बनत आहे. जागतिक ब्रोकरेज संस्था जेफरीजने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ला या क्षेत्रातील सर्वोत्तम संधी म्हणून पाहिले आहे. तेजस लढाऊ विमानांच्या वाढत्या ऑर्डर्समुळे HAL चा देशांतर्गत संरक्षण खर्चातील वाटा २५ टक्क्यांहून अधिक राहण्याची शक्यता आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) संरक्षण इलेक्ट्रॉनिक्समध्ये आघाडीवर असून QRSAM क्षेपणास्त्र प्रणालीसाठी अब्जावधींची ऑर्डर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर डेटा पॅटर्न्स (इंडिया) ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर सातत्याने मजबूत वाढ नोंदवत आहे.
एकूणच, यंदाचा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ न राहता, भारताच्या संरक्षण स्वावलंबनाचा आत्मविश्वास दाखवणारा ठरू शकतो.













