Defence Stock India:- आजच्या बाजारात पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्र चमकताना दिसतंय. सकाळपासूनच गुंतवणूकदारांचा कल संरक्षण शेअर्सकडे वळलेला दिसून आला. जागतिक राजकारणात घडणाऱ्या घडामोडी आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेली अस्थिरता यामुळे भारतीय संरक्षण कंपन्यांच्या शेअर्सना पुन्हा उधाण आलं. काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर जे वातावरण तयार झालं होतं, त्याच लाटेवर आता इस्रायल-इराण संघर्षाची भर पडली आहे.
सध्या इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष पाचव्या दिवशी पोहोचला असून, या संघर्षामुळे जागतिक स्तरावर अस्वस्थता निर्माण झाली आहे. भू-राजकीय तणावामुळे अनेक देशांनी त्यांच्या संरक्षण खर्चात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांनी भारतीय संरक्षण कंपन्यांकडे पुन्हा लक्ष केंद्रित केलं आहे. सुरक्षितता आणि दीर्घकालीन स्थिरतेच्या दृष्टीने या क्षेत्रात गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

आजची बाजारातील स्थिती कशी होती?
निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्समध्ये आज १.६% पेक्षा जास्त वाढ झाली असून, हा निर्देशांक ९,००० चा टप्पा सहज पार करून गेला. या वाढीचं नेतृत्व माझगाव डॉक शिपबिल्डर्सने केलं. या कंपनीचा शेअर तब्बल ५% ने वधारला. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्समध्ये ४% च्या आसपास वाढ झाली, तर डेटा पॅटर्न्सच्या शेअर्सनीही ३% पेक्षा जास्त उडी घेतली. त्याचवेळी भारत डायनॅमिक्स, कोचीन शिपयार्ड, बीईएमएल, सोलर इंडस्ट्रीज इंडिया आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स या कंपन्यांमध्येही १ ते २ टक्क्यांच्या दरम्यान मजबुती दिसून आली.
सगळ्याच कंपन्यांनी उंच भरारी घेतली असं नाही. झेन टेक्नॉलॉजीज, मिश्रा धातु निगम आणि अॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स यांसारख्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंचित घट झाल्याचंही पाहायला मिळालं.हे सगळं पाहता, गेल्या महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी गटांवर केलेल्या लक्ष्यित कारवाईनंतर जी तेजी दिसून आली होती, ती अजूनही टिकून आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव सध्या कमी असला तरी रशिया-युक्रेन युद्ध, आता इस्रायल-इराण संघर्ष यामुळे जागतिक बाजारात संरक्षण क्षेत्राला एक नवे बळ मिळाले आहे. गुंतवणूकदारांचा कल दीर्घकालीन ऑर्डर्स आणि धोरणात्मक गुंतवणुकीकडे वाढतोय. मात्र, विश्लेषकांनी इशारा दिला आहे की अलीकडील जोरदार तेजीमुळे काही शेअर्सचे मूल्यांकन आता अधिकच वाढले आहे आणि पुढील गुंतवणुकीत सावधगिरी ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.