Suzlon Energy Share:- आजच्या शेअर बाजारात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बाजार उघडल्यानंतर काही वेळातच या शेअरमध्ये सुमारे 1% वाढ झाली आणि तो थेट 67.84 रुपयांवर जाऊन थांबला. ही वाढ अचानकपणे आलेली नसून, त्यामागे एक मोठी आर्थिक हालचाल म्हणजेच ब्लॉक डील होती आणि या डीलमध्ये उतरले होते शेअर बाजारातले काही मोठे खेळाडू.
काय झाली नेमकी डील?
सुझलॉन एनर्जीमध्ये तब्बल 1,309 कोटी रुपयांची ब्लॉक डील झाली, ज्यात 19.81 कोटी शेअर्स हातचे हात बदलले. ही खरेदी 66.05 रुपयांच्या सरासरी भावाने झाली. हे शेअर्स विकले गेले आणि घेतले गेले. मात्र या व्यवहारामागे नेमकं कोण होतं? तर विकणाऱ्यांमध्ये कंपनीचे संस्थापक विनोद तंती आणि तंती होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड होते, जे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. दुसरीकडे, खरेदी करणाऱ्यांमध्ये काही नावं म्हणजे भारतातील नामवंत म्युच्युअल फंड आणि जागतिक गुंतवणूक बँका आहेत. जसं की मॉर्गन स्टॅनली, गोल्डमन सॅक्स, आयसीआयसीआय प्रु लाइफ, आदित्य बिर्ला सनलाईफ एमएफ, बंधन एमएफ, सुंदरम एमएफ आणि इन्व्हेस्को एमएफ.

या ब्लॉक डीलमुळे कंपनीतील 1.45% हिस्सा या मोठ्या गुंतवणूकदारांच्या हाती गेला आहे. विशेष म्हणजे, या खरेदीने बाजारात एक सकारात्मक संकेत दिला आहे. गुंतवणूकदारांनी यामागे दीर्घकालीन विश्वास दाखवला असल्याची शक्यता आहे. विशेषतः म्युच्युअल फंडांची उपस्थिती ही सूचक आहे की संस्थागत गुंतवणूकदार कंपनीच्या भविष्यातील कामगिरीबाबत आशावादी आहेत.
सध्या कंपनीतील गुंतवणूकदार आणि त्यांचा हिस्सा
मार्च 2025 अखेरीस म्युच्युअल फंडांकडे कंपनीत 4.17% हिस्सा होता, मात्र तो पसरलेला होता आणि कोणत्याही एका फंडाचा हिस्सा 1% पेक्षा अधिक नव्हता. त्यामुळे अशा मोठ्या प्रमाणात एका व्यवहारात गुंतवणूक होणं हे नवीन आणि महत्त्वाचं आहे. परदेशी गुंतवणूकदारांचं बोलायचं झालं, तर FPIs सध्या कंपनीत एकूण 23% हिस्सा धरून आहेत, पण त्यात व्हॅनगार्ड वगळता अन्य कोणाचाही हिस्सा 1% पेक्षा जास्त नाही.
कंपनीच्या भागधारकांच्या रचनेत लहान गुंतवणूकदारांचं प्रमाण मोठं आहे. तब्बल 56 लाखांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदार कंपनीचे भागधारक आहेत, ज्यांचा मिळून 25% हिस्सा आहे. यावरून लक्षात येतं की सुझलॉन एनर्जी ही कंपनी केवळ मोठ्या गुंतवणूकदारांची नाही, तर सामान्य लोकांच्या पोर्टफोलिओतही मोठ्या विश्वासाने स्थान मिळवून आहे.
या ब्लॉक डीलपूर्वी, 31 मार्चपर्यंत प्रमोटर्सकडे कंपनीतील 13% पेक्षा अधिक हिस्सा होता. आता त्यात थोडीशी घट होऊन, काही शेअर्स त्यांनी विकल्यामुळे बाजारात एक नवा समतोल तयार झाला आहे.