Tata Motors Share Price:- आजच्या बाजाराच्या सुरुवातीलाच टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये एक अनपेक्षित घसरण पाहायला मिळाली. सकाळीच या कंपनीचे शेअर सुमारे एक टक्का घसरून ६७७ रुपयांवर आले. विशेष म्हणजे, ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनीच्या उपकंपनीला, जग्वार लँड रोव्हरला, आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक चांगली बातमी मिळाली होती. अमेरिका आणि ब्रिटनमधील नवीन व्यापार करारामुळे JLR ला करामधून दिलासा मिळणार आहे, तरीही गुंतवणूकदारांनी उत्साह दाखवला नाही.
काय झाला नेमका करार?
जी७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या करारानुसार, ब्रिटनहून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रवासी वाहनांवरील आयात शुल्क २७.५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे JLR ला दरवर्षी सुमारे एक लाख वाहनांच्या विक्रीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरीही, तज्ञांच्या मते हा नवीन दर अजूनही पूर्वीच्या २.५ टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे कंपनीच्या एकूण खर्चात फारसा फरक पडणार नाही.

टाटा मोटर्सबद्दल तज्ञांचे मत काय?
याशिवाय, काही ब्रोकरेज संस्थांनी टाटा मोटर्सच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जेफरीज या आघाडीच्या ब्रोकरेज फर्मने ‘अंडरपरफॉर्म’ असे रेटिंग कायम ठेवत लक्ष्य किंमत थेट ६०० रुपयांपर्यंत खाली आणली आहे. त्यांनी पुढील दोन-तीन आर्थिक वर्षांसाठी कंपनीचा नफा (EPS) १२ ते १९ टक्क्यांनी कमी केला आहे. यामागे JLR चे मर्यादित मार्जिन, भारतातील व्यावसायिक वाहनांची सध्याची कमी मागणी आणि इलेक्ट्रिक वाहनांमधील वाढती स्पर्धा हे प्रमुख कारणं सांगितली जात आहेत.
नुवामा या संस्थेनेदेखील ‘रिड्यूस’ अशी शिफारस दिली आहे. त्यांच्यानुसार, FY26 मध्ये कंपनीचे EBIT मार्जिन ५ ते ७ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षी ८.५ टक्क्यांवर होते. अमेरिका टॅरिफचा दबाव, चीनमधील थंडावलेली मागणी आणि ब्रँडिंगवर होणारा अधिक खर्च यामुळे कंपनीचा रोख प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात घटू शकतो. FY25 मध्ये १.५ अब्ज पौंड असलेला हा प्रवाह FY26 मध्ये शून्यावर येण्याची भीती नुवामाने व्यक्त केली आहे.
टाटा मोटर्सने नुकत्याच झालेल्या ‘इन्व्हेस्टर डे’मध्ये कंपनीसमोरील काही गंभीर जोखमींचाही उल्लेख केला आहे. सेमीकंडक्टरची टंचाई, अॅल्युमिनियमच्या पुरवठ्यावरील मर्यादा, यूकेमधील वाहन चोरीचे प्रमाण आणि बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे संक्रमण या सगळ्याचा एकत्रित परिणाम कंपनीच्या भविष्यातील कामगिरीवर होऊ शकतो.
आज जर आपण बघितले तर सकाळी ९:४० वाजता टाटा मोटर्सचे शेअर्स NSE वर ६८० रुपयांपर्यंत खाली आले होते. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सुमारे ८ टक्क्यांची घसरण झाली आहे. म्हणजेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरील चांगल्या बातम्यांनाही सध्या बाजार फारसा प्रतिसाद देत नसल्याचं चित्र स्पष्ट आहे. गुंतवणूकदारांसाठी ही वेळ थोडी सावधगिरीची वाटते.