Sula Vineyards Stock:- आज शेअर बाजारात काहीशा अनपेक्षित पण रोचक हालचाली झाल्या. महाराष्ट्र सरकारने मद्यावरील करात वाढ जाहीर केली आणि त्यामुळे काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली, तर काहींनी चांगली झेप घेतली. सरकारच्या निर्णयाचा परिणाम सर्व कंपन्यांवर सारखाच होईल, असं सामान्यतः वाटतं, पण आजचा व्यवहार सांगतो की बाजार काही वेळा वेगळं गणित मांडतो.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
महाराष्ट्रात इंडियन फॉरेन लिकर म्हणजे IMFL म्हणजेच विदेशी दर्जाचं देशात तयार होणारं मद्य यावर उत्पादन शुल्क वाढवलं गेलं. परिणामी, युनायटेड स्पिरिट्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स जवळपास ६ टक्क्यांनी खाली घसरले. या कंपन्या आयएमएफएलसाठी मोठ्या प्रमाणात ओळखल्या जातात. सरकारचा हा निर्णय त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ करतो आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या नफ्यावर होतो, हीच घसरणीची मुख्य कारणं.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले
पण या चित्राच्या दुसऱ्या टोकाला उभ्या आहेत GM ब्रुअरीज आणि Sula Vineyards या कंपन्या. GM ब्रुअरीजचे शेअर्स तब्बल १८ टक्क्यांनी वाढून ₹८४६ पर्यंत पोहोचले, तर सुलाचे शेअर्स साडेसात टक्क्यांनी वाढून ₹३२० वर पोहोचले. आता प्रश्न असा की, कर वाढूनही या कंपन्यांचे गुंतवणूकदार आनंदी का?
GM ब्रुअरीजचा व्यवसाय काय?
GM ब्रुअरीजचा व्यवसाय मुख्यतः देशी दारूवर आधारित आहे. सरकारने देशी दारूवरील करही काही प्रमाणात वाढवला व तो ₹१८० वरून ₹२०५ प्रति प्रूफ लिटर तरीही ही वाढ आयएमएफएलपेक्षा तुलनेत फारशी तीव्र नाही. शिवाय, ही कंपनी महाराष्ट्रातील देशी दारू बाजारात अग्रेसर आहे. तिचा राज्याच्या एकूण देशी दारू उत्पादन शुल्कात २५-३०% हिस्सा आहे, म्हणजे ती एक प्रमुख खेळाडू आहे. बाजारात अशी अपेक्षा आहे की आयएमएफएल महाग झाल्यावर सामान्य ग्राहक स्वस्त देशी दारूकडे वळतील, आणि त्याचा थेट फायदा GM ब्रुअरीजला होईल. म्हणूनच गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या भविष्यातील कमाईची शक्यता लक्षात घेऊन खरेदीचा मार्ग निवडला.
सुला व्हाइनयार्ड्सची व्यावसायिक स्थिती काय?
सुला व्हाइनयार्ड्सच्या बाबतीत सरकारने वाइनवरील कर कायम ठेवला, म्हणजेच वाढवला नाही. सुला ही महाराष्ट्रातील प्रमुख वाइन उत्पादक कंपनी आहे आणि वाइनप्रेमींच्या जगात तिचं नाव मोठं आहे. मागच्या काही काळात या कंपनीचे शेअर्स मंदावले होते, पण आजच्या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. वाइनवरील कर न वाढवणं ही एक सकारात्मक बातमी ठरली, कारण त्यामुळे विक्रीवर परिणाम होणार नाही, आणि त्याचा लाभ कंपनीला होऊ शकतो.
हेच तत्त्व बिअर कंपन्यांवरही लागू होतं. युनायटेड ब्रुअरीज ज्यामुळे आपल्याला ‘किंगफिशर’ सारखी बिअर मिळते. या कंपनीचे शेअर्सही थोड्याफार प्रमाणात वर गेले. कारण बिअरवरही करवाढ झालेली नाही. आता बाजारात चर्चा अशी आहे की आयएमएफएल महाग झाल्यावर काही ग्राहक प्रीमियम बिअरकडे वळतील. त्यामुळे बिअर कंपन्यांच्या विक्रीत वाढ होऊ शकते, आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांनी युनायटेड ब्रुअरीजमध्ये रस दाखवला.